मुंबई : भाजप पक्षाचे बाहेरच्या राज्यातून लोक येऊन महाराष्ट्रात काम करतात, त्या पद्धतीनेच आपण आता काम केलं पाहिजे. शिवसैनिकांनी तळागाळात जाऊन कामाला लागलं पाहिजे अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महापालिका निवडणूक कधीही लागू शकते, त्यामुळे तात्काळ कामाला लागा अशा सूचनाही ठाकरेंनी दिल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून सेनेच्या माजी नगरसेवकांना सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणूक कधीही लागू शकते, त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर शिवसेनेने लढवावी असा सूर बहुतांश माजी नगरसेवकांकडून उमटल्याची माहिती आहे.
हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा
शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य ते उत्तर द्या अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे.
भाजप पक्षाची बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात. तसं आपणही तळागळात जाऊन काम केलं पाहिजे असं मत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांसमोर मांडलं. महापालिका निवडणुकीसाठी 18 निरीक्षकांना नेमून प्रत्येकी 12 प्रभागांची चाचपणी करण्याचे आणि त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्याच्या घडीला जवळपास 64 नगरसेवक उद्धव ठाकरेंसोबत असल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे नेमके बैठकीत काय म्हणाले?
पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना सूचना देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल, निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंच्या बाबतीत करतील. RSS चा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस पत्रक वाटाण्यापुरती होती. सध्या सुरु असलेल्या सत्ता स्थापनेत शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. पण आपण मुंबई महापालिका जिंकायाचीच आहे."
उद्धव ठाकरेंकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबिर घेण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा: