मुंबई : शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडून मुंबई महापालिकेतील आपली बाजू भक्कम केली आहे. या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (मंगळवार) तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहेत.
गेले अनेक दिवस मुंबईतील राजकारण बरंच ढवळून निघालं होतं. या सर्व राजकारणातून थोडीशी उसंत घेऊन उद्धव ठाकरे देवदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत मुंबई आणि ठाणे महापालिकेचे महापौरही बालाजीचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे उद्या पहाटे तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहेत.
दरम्यान, बालाजीच्या दर्शनाला रवाना होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी 2019 निवडणुकीसाठी तयारीही सुरु केली आहे. काही संपर्कप्रमुख बदलण्यास उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली आहे.
रायगड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असलेल्या आदेश बांदेकर यांच्याकडे सिद्धीविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाची जबाबदारी असल्यानं रायगडच्या संपर्कप्रमुख पदी ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अनंत तरे यांच्याकडे महाड, श्रीवर्धन, अलिबाग आणि पेणची जबाबदारी असणार आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्याकडे कर्जत-खालापूर, पनवेल आणि उरणची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे पालघर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार रवींद्र फाटक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कोकण विभागातील महत्वाचे बदल करुन शिवसेनेनं तेथील आपला पाया आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे.