Uddhav Thackeray Interview by Sanjay Raut : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सामनामधील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, 'प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान... उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे. 


आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे


उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झालो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा. आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते. गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता, असं ठाकरे म्हणाले.


तो सत्तापिपासूपणा रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता 


उद्धव ठाकरे म्हणाले की,  2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमपं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय. त्यांची लालसा! स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की, 'ही आमची शिवसेना' म्हणून. अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार. हे बघितल्यानंतर मला नाही वाटत, भाजप त्यांना कधी पुढे करील. नाही तर नंतर ते नरेंद्र भाईंशी तुलना करतील स्वतःची आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे. मी पण अडीच वर्षं मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही. तो सत्तापिपासूपणा रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कुणी तुमचं नसतं तेच त्यांचं आज झालं आहे, असं त्यांनी म्हटलं. 


'हेल्दी पॉलिटिक्स' करावं
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'हेल्दी पॉलिटिक्स' करावं. आम्ही तर मित्रच होतो. 25-30 वर्षे आपण त्यांचे सोबतीच होतो. तरीसुद्धा त्यांनी 2014 ला युती तोडली. कारण काहीही नव्हतं. तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाही. तेव्हासुद्धा भाजपने शिवसेनेशी युती शेवटच्या क्षणाला तोडली होती. त्यावेळी तर आम्ही मित्रच होतो त्यांचे 2019 ला. काय मागत होतो? मी अडीच वर्षांसाठी शिवसेनेकरिता मुख्यमंत्रीपद मागत होतो आणि द्यायचं ठरलं होतं. ते मुख्यमंत्रीपद माझ्यासाठी नव्हतं. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद का मागितले होते? तर मी सरत्या काळामध्ये माननीय शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. मात्र तसं बघितलं तर माझं ते वचन अजूनही अर्धवटच आहे असे म्हणावे लागेल. कारण मी मुख्यमंत्री बनेन असे म्हणालो नव्हतो. मुख्यमंत्री पद मला एक आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. कारण सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपकडून त्या नाकारण्यात आल्या. म्हणून मला ते करावं लागलं, असं ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Uddhav Thackeray : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!'; उद्धव ठाकरेंचा मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही हल्लाबोल


Uddhav Thackeray Interview : 'यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार


Uddhav Thackeray Interview : क्रॅम्प आला अन् मानेखालची हालचालच थांबली; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' अनुभव


Uddhav Thackeray Interview : माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या : उद्धव ठाकरे