Uddhav Thackeray Interview : "काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या," असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांच्या अभूतपूर्व बंडाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) अल्पमतात आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. या सर्व घडमोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच 'सामना'चे (Saamna) कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिली. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित झाला. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासह भाजपवर जोरदार शाब्दिक वार केले. 


सडलेली पानं आता गळून पडत आहेत. काही दिवसात नवीन पानं पुन्हा येतील, असं शब्दात बंडखोरांचा उल्लेख केला आणि सध्याची परिस्थिती बदलेल असा आशावाद व्यक्त केला. आपल्यासोबत अनेक वरिष्ठ शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आशीर्वाद देत आहेत, अस उद्धव ठाकरे म्हणाले.


...तेव्हा सत्तांतराच्या हालचाली सुरु होत्या : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाहीत असा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. या काळात उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे राज्यभर फिरले नाहीत, असंही सांगण्यात आलं. मुलाखतीत शस्त्रक्रियेविषयी बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले. 'शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती,' असं त्यांनी सांगितलं. "काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या," असा मोठा आणि गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. शिवसेनेकडे आम्ही पक्ष नव्हे परिवार म्हणून पाहिलं. ज्यांना पक्ष संभाळायला दिला त्यांनीच विश्वासघात केला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 


भाजपने हे आधीच केलं असतं तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत भाजपवर जोरदार निशाणा साधला. "2019 च्या बोलणीप्रमाणे भाजपने आता केलं आहे. हे आधीच केलं असतं तर देशभर पर्यटनाची गरज पडली नसती. हजारो कोटीचा खर्च करण्याची वेळ आली नसती. आधी केलं असतं तर भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं." भाजपला शिवसेना संपवायची आहे, असा आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपला हिंदुत्वात भागीदारी नको असेल. परंतु शिवसेनेचं राजकारण हिंदुत्वाच्या मजबुतीसाठी आहे. तर भाजपचं हिंदुत्व राजकारण करण्यासाठी आहे. मी हिंदुत्वविरोधी काय केलं हे दाखवून द्यावं. अयोध्येत महाराष्ट्र भवन हे आम्ही केलं. नवी मुंबईत तिरुपती मंदिरासाठी जागा दिली. प्राचीन मंदिरांचा विकास केला. असं कोणतं काम हिंदुत्वविरोधी केलं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.


"शिवसेना आणि संघर्ष हे पाचवीला पुजलेलं आहे." असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना ही तळपती तलवार, ती म्यानात राहू शकत नाही. संघर्षासाठीच शिवसेना जन्माला आली. अन्याय तिथे वार, हेच शिवसेनेचे ब्रीदवाक्य असल्याचं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.


शिवसेना आणि ठाण्याचं नातं तोडता येणार नाही. पालापाचोळा शिवसेना आणि ठाण्याचं नातं तोडू शकत नाही. महाराष्ट्र आता फक्त निवडणुकांची वाट बघतोय, असं सांगताना युती करताना काय ठरलं याचे करार जनतेसमोर ठेवा. निवडणूक आयोगाने असा नियम करावा, अशी आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.


घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला : उद्धव ठाकरे
"भाजपने शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्म नसता. लाखो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता निवडणुका घ्या, चूक केली असेल तर घरी बसवतील. ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रासाठी काम करत आहे. घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला," असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. तसंच "बंडखोरांना वेगळा गट स्थापन करता येणार नाही. बंडखोरांना कुठल्या तरी पक्षात जावं लागेल. बंडखोर कुठल्या पक्षात गेले तर भाजपची पंचाईत होईल," असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.


मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. शिवाय यावेळी त्यांनी प्रॉम्टिंग देखील केलं. यावरुनही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. "माझा माईक कधी कुणी खेचला नाही. महाविकास आघाडीमध्ये समन्वय आणि सभ्यता होती," असं ते म्हणाले.


स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावून मतं मागा : उद्धव ठाकरे
शिवसैनिकांमध्येच लढाई लावण्याचा भाजपचा डाव आहे. भाजपला शिवसेना-ठाकरे हे नातं तोडायचं आहे. पक्षाप्रमाणे आदर्श पळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा, असं म्हणत माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावून मतं मागण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. तसंच माझे वडील का चोरत आहात? बाळासाहेबांवरुन संभ्रम का निर्माण करत आहात, असे सवालही उपस्थित केले.


देशाच्या घटनेवर, कायद्यावर माझा विश्वास आहे. चोरीमारी सगळीकडेच चालते असं नाही. असं असेल तर सत्यमेव जयते हे वाक्य पुसावं लागेल. एकतर असत्यमेव जयते किवा सत्तामेव जयते हे करावं लागेल. पुरावे नाही द्यावे लागत जनताच यांना पुरुन टाकतील. जनताच आता निवडणुकीची वाट बघत आहे.
जनताच बंडखोरांना पुरुन टाकेल, असं ते म्हणाले. 


'त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय'
मलाई खाण्यासाठी मी मुख्यमंत्रिपदी नव्हतो. स्वतःकडे कोणतीही मोठी खाती ठेवली नव्हती. एका मंत्र्याने दिवा लावला म्हणून ते खातं माझ्याकडे आलं होतं. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार संजय राठोड यांना टोला लगावला. परिवारातले समजून विश्वास ठेवला हीच माझी चूक झाली. त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांशी करत आहेत, असा आरोप नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर केला.  सध्या सुरु आहे ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात, अस ठाकरे म्हणाले.


घराबाहेर न पडताही देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये नाव : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे आता घराबाहेर पडत आहे. हे आधीच केलं असतं तर ही वेळ आली नसतील, असा टोल बंडखोर आमदारांसह भाजपही लगावत आहेत. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर जनतेने उठाव केला असता. मविआच्या कामावर जनता आनंदी होती. कामामुळेच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव होतं. घराबाहेर न पडताही देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये नाव आलं होतं. मी घराबाहेर पडलो की गर्दी होते. त्यावेळी घराबाहेर न पडणं ही काळाची गरज होती."


'चला उठा पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवू'
सामान्यातून आता असामान्य घडवण्याची वेळ आली. चला उठा पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवू. त्यांना मी ताकद दिली ही माझी चूक झाली. राजकारणात जन्म दिला त्यांना गिळायला निघालेली ही औलाद आहे. विश्वासघातकी आईलाच गिळायला निघाले आहेत. निष्ठा कधीच विकली जाऊ शकत नाही. दिल्लीत गेले नाही तोपर्यंत बाळासाहेबांनीच वाचवलं. ज्यांनी जन्म दिला त्यांनाच का संपवायला निघाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.