मुंबई: मुंबईत गेल्या दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या पेंग्विनच्या दर्शनाचा मार्ग आज मोकळा झाला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते पेंग्विन कक्षाचा लोकार्पण सोहळा पार पडला.


पेंग्विन कक्षाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘पेग्विंन आणल्यानंतर बराच गदारोळ झाला. पण पेंग्विन आणणं म्हणजे क्रॉर्फड मार्केटमधून कबूतर आणण्यासारखं वाटलं का?’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘पेंग्विन आता फक्त पुस्तकात किंवा टीव्हीवर दिसणार नाही. तर मुंबईकरांना राणीच्या बागेत ‘पारदर्शक’ काचेमागे पेंग्विन पाहता येतील. आमची काच पारदर्शकच आहे.’ असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी लगावला.

‘पेंग्विन आणणारी मुंबई ही देशातील पहिलीच महापालिका आहे.’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, पेंग्विन कक्षाच्या लोकार्पण सोहळ्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा राजकारण रंगल्याचं दिसून आलं. कारण लोकार्पण सोहळ्यावर, भाजप आणि सपानं बहिष्कार टाकला. भाजपच्या नेत्यांना या कार्यक्रमाला निमंत्रणच देण्यात आलं नव्हतं असंही समजतं आहे.

‘माध्यमांकडून मला या कार्यक्रमाची माहिती मिळाली’, असं भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून जन्माला आलेल्या पेंग्विन दर्शनाच्या प्रकल्पासाठी पालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. या खर्चावरूनही विरोधी पक्षानं शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे.

संबंधित बातम्या:

मुंबईकरांना आजपासून राणीच्या बागेत पेंग्विनदर्शन !