मुंबई : कॉंग्रेसमधून विचार गेला, विकार आला आहे. त्यामुळे तो पक्ष महाराष्ट्रात उरला नाही. महायुतीचं सगळीकडे वातावरण तयार आहे. काँग्रेस पक्ष आता महाराष्ट्रात उरलाच नाही, राष्ट्रवादी काँग्रेसही संपत आली आहे. समोर विरोधी पक्ष राहिला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसही संपत आली आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. बीकेसीच्या मैदानात आयोजित महायुतीच्या सभेत ते  बोलत होते.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता महाराष्ट्रात भगवं वातावरण दिसतं आहे. समोर दुसरं कुणी आहे की नाही तेच कळत नाही. शिवसेनेने वचननामा दिला आहे. भाजपचाही जाहीरनामा आला आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.

काँग्रेस पक्ष थकला आहे अशी कबुली सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. बरोबर आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष खाऊन खाऊन थकले आहेत. काँग्रेसमध्ये एक काळ असा होता की नेत्यांची नावं घेतली की आदराने मान खाली जायची आता काँग्रेसवाल्यांमुळे शरमेने मान खाली जाते, असे ते म्हणाले.

निवडणुकीला काँग्रेसच्या नेत्यांनी व्यवसायांचं स्वरुप दिलं. आमच्यासमोर आता कुणी विरोधक उरलेला नाही त्यामुळे आव्हान मोठं आहे. सध्या महाराष्ट्रात मजबूत आणि काम करणारं सरकार देऊ शकते हे महायुतीने गेल्या पाच वर्षात सिद्ध केलं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

लोकसभेत भगवा फडकवला आहे तोच भगवा आता विधानसभेवरही फडकवू हे लोकांनी ठरवलं आहे कारण लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.