मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध करण्यात आला. शिवसेना-भाजप पक्षांमधील मतभेदांवर उद्धव ठाकरेंनी परखड उत्तरं दिली आहेत. त्याचबरोबर कर्जमुक्ती झाली. मात्र, समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचं वाटोळे होऊ देणार नाही. असंही ते मुलाखतीत म्हणाले.

शिवसेना-भाजपमधील वाद चव्हाट्यावर आल्यानं फक्त लोकांची करमणूक झाल्याचंही ते म्हणाले. जर शिवसेना शत्रू आहे तर मग चीन आणि पाकिस्तान कोण? असा सवाल त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून भाजपला विचारला आहे.

तुमचं भांडण इतक्या टोकाला जाऊनसुद्धा शिवसेना अद्यापि सत्तेत कशी? या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,  ‘मी तुम्हाला आधीही सांगितलंय ना की माझ्या महाराष्ट्रासाठी मी कमीपणा घेतलाय समजा.’ असंही उद्धव ठाकरें हे या मुलाखतीत म्हणाले.

एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले तेव्हा ते माझ्याशी मराठीत बोलले. त्याचबरोबर त्यांच्याशी आपले वैयक्तिक संबंध चांगले असल्याचंही उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

एक नजर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर:

 

तुमच्या मित्रपक्षाच्या अनेक बैठकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना एक संदेश नेहमीच दिला जातो तो म्हणजे शिवसेना हाच भारतीय जनता पक्षाचा नंबर एक’चा शत्रू आहे!

म्हणून कदाचित पाकिस्तान आणि चीनकडे दुर्लक्ष झालं की काय? त्यांना पाकिस्तान आणि चीनपेक्षा शिवसेना हाच महत्त्वाचा शत्रू वाटत असेल तर ते त्यांचं दुर्दैव आहे, माझं नाही.

 

तुमची सर्व राजकीय लढाई यापुढची त्यांच्याबरोबरच होणार आहे…

ही लढाई म्हणजे राजकारण आहे. या राजकीय लढाया तर होतच राहतील. मला त्याची पर्वा नाहीय. जोपर्यंत शिवसेनाप्रमुखांचा जिवंत शिवसैनिक माझ्यासोबत आहे, निष्ठावंत शिवसैनिक माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला या राजकीय लढायांची पर्वा नाही. मला आता खरंच चिंता आहे ती पाकिस्तान आणि चीन.

 

म्हणजे तुम्ही सीमेवरील तणावाविषयी बोलताय?

होय. आता असं नेमकं काय झालेलं आहे की जो कश्मीर मागचा बराच काळ शांत होता तो जवळपास वर्षभर म्हणजे बुऱहाण वाणीला मारल्यानंतर तो धगधगतोय म्हणण्यापेक्षा पेटलाच आहे. असं नेमकं काय झालं की झोपाळय़ावर झोके दिल्यानंतर शेव-गाठय़ा खाल्ल्यानंतरसुद्धा चिनी ड्रॅगन आपल्या अंगावरती येतोय. म्हणजे नेमकं आपलं कुठं चुकतंय?  पंतप्रधान तर जगप्रवास करताहेत. संपूर्ण दुनिया आता त्यांची मित्र झालेली आहे. पण ती दुनिया जरी मित्र झाली तरी हे दोन शत्रू आपल्याला भारी का पडताहेत? मग आपला एक तरी मित्र या शत्रूंना वठणीवर आणण्यासाठी उघडपणे मदतीला का येत नाहीय?

 

चीनचा धोका जास्त वाढलाय…

चीन आता आपल्याला सरळ धमकवतोय.  ६२ सालचा हिंदुस्थान आता राहिलेला नाहीय. ६२ सालचा चीन आता राहिलेला नाहीय. हे सगळं बोलण्यापुरतं बरं वाटतंय पण चीनची जी काही ताकद आहे ती ताकद आपल्याला नजरेआड करता येणार नाही आणि त्या ताकदीला टक्कर देण्याएवढी शक्ती ती कमावण्याकडे लक्ष देण्याची आज आपल्याला गरज आहे. फक्त निवडणुका आणि देशांतर्गत राजकारणामध्येच सत्ताधारी पक्ष अडकून राहणार असेल तर तो मला वाटतं देशावर अन्याय ठरेल.

 

तुमचं भांडण इतक्या टोकाला जाऊनसुद्धा शिवसेना अद्यापि सत्तेत कशी?

मी तुम्हाला आधीही सांगितलंय ना की माझ्या महाराष्ट्रासाठी मी कमीपणा घेतलाय समजा.

 

हा कमीपणा आणखी किती काळ घेणार आहात?

जोपर्यंत मला वाटत नाही की आता यांच्याबरोबर राहण्यात काही अर्थ राहिलाय. कारण जर का पूर्वीचा अनुभव लक्षात घेतला तर काँग्रेसला घालवणे हे तर आपल्या सगळय़ांचं ध्येय होतंच. राष्ट्रवादी त्यांच्यासोबतच आली. काँग्रेसला देशातून घालवावी म्हणूनच आम्हीसुद्धा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. त्याच्यानंतर त्यांनी युती तोडली. जे व्हायचं ते झालं. आणि चांगलं काही घडायचं असेल तर ठीक आहे. या वेळेला आपली सत्ता आली नाही, मग २५ वर्षं जे आपल्यासोबत राहिले त्यांची सत्ता जर येत असेल तर येऊ द्या. आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे काही चांगलं करायचं आहे ते जर का होत असेल तर एकदा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे!

 

तो प्रयोग किंवा प्रयत्न सफल होतोय असं वाटतंय?

आता अडीचेक वर्षं झालेली आहेत. पहिला महत्त्वाचा टप्पा आलाय कर्जमुक्तीचा. त्याच्यानंतर दुसरा येईल तो समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गाच्या बाबतीतसुद्धा शिवसेनेची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. विकासाच्या आड काय आम्ही आलेलो नाही आहोत, परंतु शेतकऱ्यांचं वाटोळं करून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून मी हा समृद्धीचा विकास होऊ देणार नाही.

मधल्या काळात अमित शाह तुम्हाला भेटून गेले…

होय. दोन-तीन वर्षांनंतर ते घरी आले होते. मध्ये मी दिल्लीला गेलो होतो एनडीएच्या बैठकीला तेव्हाही त्यांची भेट झाली. अर्थातच भेटल्यानंतर चर्चा चांगलीच होते. तशी ती दोन्ही वेळेसही झाली आणि पुनः पुन्हा भेटत राहू असंही ठरत असतं. ‘मातोश्री’ला त्याही वेळेला सगळी मोठमोठी माणसं येत होती. सतत भेटणं, येत-जात राहणं हे चांगल्या आपुलकीचं लक्षण आहे. त्यांच्यामध्ये मानपानाचं वगैरे काही नसतं.

 

एनडीए’च्या बैठकीत तुम्हाला पंतप्रधान मोदीही भेटले…

होय. अगदी प्रेमाने. त्यांनी खास आग्रह करून मला त्यांच्या बरोबर जेवायला बसवले. विशेष म्हणजे माझ्याशी मराठीत बोलले. अगदी घरचीसुद्धा चौकशी केली.