मुंबई/पालघर : एक खड्डा... रस्त्यावरचा एक खड्डा किती मोठं नुकसान करु शकतो, याचं विषण्ण करणारं उदाहरण पालघरमध्ये पहायला मिळालं. आपल्या तत्त्वांवर जगणारी एक महिला, स्त्रियांना नवं बळ देणारी एक महिला... एका खड्ड्यामुळे या जगातून कायमची निघून गेली...


अवघा देश पालथा घालणाऱ्या जागृती होगाळे या महिला बुलेट रायडरला एका खड्ड्याने चकवलं. मूळची मुंबईची जागृती होगाळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर वेती गावाजवळ रायडिंग करत होती. त्यावेळी तिची 350 सीसी रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड खड्ड्यात आदळली. त्यामुळे ती खाली पडली आणि ट्रकखाली चिरडून गंभीर जखमी झाली.

तिच्यासोबत असलेल्या दोन बाईक रायडर्सनी तात्काळ तिला हॉस्पिटलला नेलं, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिने हेल्मेट घातलं होतं, मात्र ट्रकखाली सापडल्याने तिचा मृत्यू ओढावला. जागृतीच्या पश्चात पती विराज आणि 9 वर्षांचा मुलगा आहे.

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातल्या खड्ड्यांनी 4 चालकांचा जीव घेतला आहे. त्यानंतरही झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

खड्ड्यात बाईक आदळून महिला रायडरचा मृत्यू


जागृती होगाळे ही गृहिणी असली, तरी मुंबईमध्ये बाईकरनी नावाच्या ग्रुपची ती अॅक्टिव्ह मेंबर होती. ज्या महिलांना बाईक रायडिंगची आवड आहे, अशा महिलांची मोट बांधून तिने मोठमोठ्या मोहिमा आखल्या होत्या.

महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेक खडतर वाटा जागृतीने धुंडाळल्या होत्या. लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत
आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत जागृतीचा थक्क करणारा प्रवास होता. मुंबईतल्या मोरया ढोल ताशा पथकाची ती सदस्य होती. वांद्र्यातल्या कलानगरमध्ये ती राहायची जाहिरात क्षेत्रामध्ये फ्रीलान्सिंग काम करत असतानाच तिने रायडिंगची आवड जोपासली.