मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर दोघांमध्ये विस्तव जात नव्हता. मात्र भुजबळांच्या तुरुंगवारीनंतर त्यांच्याबद्दल शिवसेनेतून सहानुभुती व्यक्त होत आहे. त्यातच आता या दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट झाली.


एका लग्नाच्या निमित्तानं दोघे एकमेकांना भेटले. शनिवारी 25 ऑगस्टला वरळीत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाथन यांच्या मुलाचं लग्न होतं. या लग्नाला दोघांनीही हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते.

या भेटीत दोघांमध्ये कशावर चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

याआधी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांविषयी सामनातून सहानुभूती व्यक्त करण्यात आली होती. तर आमचे 25 वर्षांपासून ऋणानुबंध आहेत, असं उत्तर त्यावर छगन भुजबळांनी दिलं होतं.

शिवाय भुजबळांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी समीर यांना छगन भुजबळांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

'25 वर्षांचे ऋणानुबंध'

शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलेलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध असतातच, असे म्हणत छगन भुजबळ यांनी उद्ध ठाकरेंनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. तसेच, माझ्या पडत्या काळात शिवसेनेने दोन शब्द चांगले बोलले, याचे समाधानही आहे, असे भुजबळ म्हणाले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मे महिन्यता भुजबळ सांताक्रुझमधील त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता.

संबंधित बातम्या

शिवसेनेशी 25 वर्षांचे ऋणानुबंध, काळजी असणारच : भुजबळ 

भुजबळांच्या तब्येतीची काळजी घे, उद्धव ठाकरेंचा पंकजला सल्ला  

मुंबई : या चार अटींवर छगन भुजबळांना जामीन मिळाला 

बाळासाहेबांच्या अटकेची फाईल माझ्या अगोदरच तयार झाली होती : भुजबळ