मुंबई : वाहतूक कोंडीत अडकून वेळेवर उपचार न मिळाल्याने 50 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील मरोळ नाका परिसरातील ही घटना आहे. मोहम्मद अक्रम खान यांचा वाहतूक कोंडीत अडकून उपचाराअभावी मृत्यू झाला.

मोहम्मद अक्रम खान हे मरोळ नाका परिसरातील रहिवासी असून 25 ऑगस्टला रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांचे भाऊ रिक्षाने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी निघाले. मात्र वाहतूक कोंडीमुळे मोहम्मद अक्रम खान यांना उपचार मिळू शकले नाही.

अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात जाण्यासाठी मरोळ नाका रस्त्यावरील ट्राफिकमुळे त्यांना तब्बल 45 मिनिटे लागले आणि त्यातच मोहमद अक्रम खान यांचा मृत्यू  झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मेट्रोच्या कामामुळे मरोळ नाका परिसरात ट्रॅफिक होत आहे. त्यावर लवकरात लवकर पर्याय काढावा जेणेकरुन पुन्हा कुणावर अशी वेळ येणार नाही, अशी मागणी आता होत आहे.