मुंबई: ‘एकदा युती तोडल्यानंतर आता पुन्हा युतीचा विचार नाही’, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पुन्हा युती न करण्याचं ठासून सांगितलं आहे.
‘मुंबई तोडण्यासाठीच भाजपचा मुंबई महापालिकेवर डोळा आहे’ अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरेंनी सामनातून केली आहे. सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका करत मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
एक नजर उद्धव ठाकरेंच्या सामनातील मुलाखतीवर:
‘‘मी माझ्या शिवसेनेची वेगळी वाटचाल सुरू केली आहे. मुंबईच्या अस्मितेची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे. हे रण आम्हीच जिंकणार!’’
प्रश्न: आतापर्यंत शिवसेनेने अनेक विजय मिळवले. महानगरपालिका असतील, विधानसभा आणि लोकसभा असतील; पण यावेळचं रण थोडं वेगळं आहे असं वाटत नाही का?
उत्तर: थोडं नाही. भरपूर वेगळं आहे. गोरेगावच्या माझ्या भाषणात मी सविस्तर बोललोय. भाषण मानत नाही. माझं ते मनोगतच होतं. मन की बात बोलणं विचित्र वाटतं, पण माझ्या हृदयातली गोष्ट मी बोललो की पंचवीस वर्षे आपली युतीच्या राजकारणामध्ये सडली. पंचवीस वर्षे आम्ही वेडय़ा अपेक्षेने सत्तेची लालसा न धरता काम केले. आजही आम्हाला तशी ती लालसा नाही.
प्रश्न: मग कशाकरता युती केली?
उत्तर: कशाकरता केली म्हणजे? ते काय पुनः पुन्हा सांगायलाच हवे. हिंदुत्वाचा मुद्दा तर आहेच. मी मघाशी म्हणालो, सत्तेची लालसा आजही नाहीय, पण काम करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आहेतच आणि पंचवीस वर्षे आम्ही – मग त्यास देशप्रेम म्हणा, हिंदूहित म्हणा, या सर्व गोष्टी जोपासण्यासाठी काँग्रेसविरोधी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून युती टिकवून ठेवली. पिढय़ा बदलल्या. भाजपची पण पिढी बदलली. शिवसेनेची पण पिढी बदलली. पिढी जरी बदलली असली तरी मला असं वाटतं, संस्कार बदलता कामा नयेत. आम्ही आजही तेच संस्कार घेऊन पुढे चाललेलो आहोत. शिवसेनेने कधीही केवळ सत्तेसाठी म्हणून आपल्या विचारांशी प्रतारणा केलेली नाही. म्हणून मला असं वाटतं, आता वेगळी वाटचाल सुरू करण्याची गरज आहे. 26 जानेवारीलाच मी जाहीर केलंय की, मी माझ्या शिवसेनेची वेगळी वाटचाल सुरू करीत आहे.
प्रश्न: मुंबई महाराष्ट्रापासून, खासकरून मराठी माणसाकडून हिसकावून घेण्यासाठी युद्ध सुरू आहे काय?
उत्तर: मुळात प्रश्न आहे, हा अट्टहास का म्हणून? शिवसेनेचा जो कारभार आहे तो पाहता फक्त निवडणुकीत येऊन षड्डू ठोकणारे आम्ही प्रचारवीर नाही आहोत. जो बाळासाहेबांचा शिवसैनिक मुंबईच्या गल्लीबोळांमध्ये अक्षरशः राब राब राबतोय; मग एखाद्या मुलाच्या जन्मापासून त्याच्या जन्माचा दाखला असेल, शाळेचा प्रवेश असेल, नोकरी असेल, इतर काही अडचणी असतील. कदाचित दुर्दैवाने काही घातपात-अपघात होतात. आजारपण येतात. त्याही वेळेला धावून जातो तो आमचा शिवसैनिक. मला मत देशील तर मदत करतो, मत देशील का रे? मी तुला रक्तदान करतो, असे विचारून तो काम करीत नाही. तो कोणाचा कार्यकर्ता आहे? भाजपचा आहे की काँग्रेसचा आहे, हिंदू की मुसलमान, मराठी की इतर कोणी…हे न पाहता राबत असतो. स्वतःच्या जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता. आणि अशा शिवसैनिकाचा हक्क नाही म्हणत, पण मानसन्मान तुम्ही ठेवू शकत नसाल तर तुमची मला गरज नाही.
प्रश्न: भारतीय जनता पक्षाला मुंबईची सत्ता कशाकरता हवी आहे असं वाटतं?
उत्तर: उद्देश दुसरा काय असू शकतो. गेल्या काही वर्षांतल्या हालचाली, तुम्ही काय पाहताय? काही गोष्टी मी गांभीर्याने घेतल्या नाहीत; कारण एकदम टोकाचं भांडण मित्रासोबत होऊ नये अशी माझी इच्छा होती. पण माझी आतून सरकारी पातळीवर लढाई सुरूच होती.
प्रश्न: काय पाहिलंत तुम्ही असं?
उत्तर: गेल्या दोनेक वर्षांमध्ये मुंबईचं जे खच्चीकरण चाललं आहे ते धक्कादायक आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू तर कुणीच शकत नाही हे तर नक्कीच. तशी हिंमत कुणी स्वप्नातसुद्धा करू नये. मग काय करायचं? हातात सत्ता आहे ना; तर त्या अधिकाराचा दुरुपयोग करून मुंबईचं महत्त्व कमी करायचं.
प्रश्न: हे कसं काय शक्य आहे?
उत्तर: कसं शक्य आहे म्हणजे? सत्तेचा वरवंटा आहे ना त्यांच्या हाती. मुंबईत एअर इंडियापासून सर्व केंद्रीय आस्थापनांची मुख्यालयं होती ती हलवणं, इतरत्र उद्योगधंदे हलवणं, मुंबईतल्या उद्योगपतींना फूस लावणं, मुंबईचं महत्त्व कमी करणं. या चाळय़ांना मात्र पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि आता हे सहनशीलतेच्या पलीकडे जात चाललेलं आहे. किंबहुना ते गेलेलं आहे.
प्रश्न: मुंबईचं खच्चीकरण करण्यासाठीच शिवसेनेचं खच्चीकरण चाललंय काय?
उत्तर: मुळामध्ये प्रश्न शिवसेनेच्या खच्चीकरणाचा आणि ताकदीचा नाहीच आहे. मुंबई शिवसेनेनेच राखली आहे. हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. 92 च्या दंगलीत सगळय़ांच्या शेळय़ा झाल्या होत्या. तेव्हा माझा शिवसैनिकच येथे वाघासारखा लढला. शिवसेना हीच मुंबईची ताकद आहे. ही मुंबईची ताकद खच्ची केली तर आपल्याला मुंबई विनासायास मिळेल अशी स्वप्नं पाहणारे जे कुणी असतील त्यांचं स्वप्न मुंबईकर कधीच पूर्ण करणार नाहीत. शक्यच नाही.
प्रश्न: हे विश्वासघाताचं राजकारण आहे…
उत्तर: मला एक सांगा, पंचवीस वर्षं आमची मैत्री होतीच ना? आम्ही लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून तुमचा प्रचार केला ना? मग तुमच्यामध्ये एवढाही मोठेपणा का नसावा की, बाबा वाईट काळात आपल्याबरोबर राहिलेला हा मित्र आहे. आपले ‘अच्छे दिन’ आले म्हणून काय तुम्हाला शिंगं फुटली? लगेच तुम्ही मोठे भाऊ झालात?
प्रश्न: वाईट काळात फक्त शिवसेनाच त्यांच्यासोबत होती…
उत्तर : आमच्याशिवाय दुसरं कोण होतं त्यांच्या पाठीशी? गोध्रा प्रकारानंतर जे घडलं त्यावेळेला मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली ती एकटी शिवसेना. संपूर्ण देशात. ही जाणसुद्धा तुम्ही ठेवलेली नाही. त्यावेळेला ज्यांनी तुम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून राजकारण करण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहात आणि संकटाच्या वेळेला जे शिवसेनाप्रमुख व्यक्तिगतरीत्या तुमच्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. मुंबईसुद्धा आता तुम्हालाच हवी. मग तुम्हाला कुठेच आमचं अस्तित्व नको असेल आणि मुफ्ती मोहम्मद सईद चालत असेल तर या युतीला काहीच अर्थ नाहीय. मतभेद आणि मनभेद असे जे अमित शहा म्हणाले ते मतभेद इथे आहेतच.
संबंधित बातम्या:
सत्तेसाठी भाजपची कुणाशीही हातमिळवणी : उद्धव ठाकरे
शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली?