उद्धव ठाकरे सुरुवातीपासून मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यानंतर त्यांची जाहीर सभाही होणार आहे. विमा कंपन्या जाणून-बुजून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी याआधीच केला होता. मात्र सत्तेत असूनही कंपन्यांवर दबाव न आणता रस्त्यावर मोर्चा काढून शिवसेनेला नेमकं काय दाखवायचं आहे, असा प्रश्नही विचारला जात आहे.
हा मोर्चा शेतकरी मोर्चा नसेल, तर शेतकऱ्यांसाठी मोर्चा असेल. शिवसेनेचा हा इशारा मोर्चा आहे. जर इशारा देऊनही झालं नाही तर आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. केंद्राकडे स्वतंत्र कृषी स्थापन करण्याची मागणी केल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.
शेतकरी कर्जमाफी हा विषय जुना आहे, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. 'पंतप्रधान पीक विमा योजना' चांगली असली, तरी ही योजना, यंत्रणा तळगाळात पोहचत नाही. सरकार जरी बदललं असलं, तरी यंत्रणा तीच आहे. आजही काही प्रकरणं बाकी आहेत, लोकांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हा इशारा मोर्चा निघणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं.