मुंबई : मुंबईसह महानगरांमध्ये टॅक्सीसेवा देणारी 'उबर' आता जल वाहतुकीतही उतरली आहे. टॅक्सीसोबतच उबरची बोट सर्व्हिस सुरु होणार आहे. गेट वे ऑफ इंडियापासून मांडवा जेट्टी आणि एलिफंटा लेण्यापर्यंत आपण या उबर बोटीने प्रवास करु शकतो.

येत्या एक फेब्रुवारीपासून ही सेवा सुरु होईल. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेटी हे 19 किमी अंतर आहे. स्पीड बोट असल्यामुळे अतिशय कमी वेळेत गेटवेहून मांडवा आणि एलिफंटापर्यंत पोहचता येईल.

सामान्यपणे फेरीबोटीने या प्रवासाला एक तासाचा अवधी लागतो, तर रस्तेमार्गाने तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र स्पीडबोटीने 20 ते 25 मिनिटांत हा प्रवास होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना 6 ते 8 आसनी आणि दहा किंवा त्याहून जास्त आसनाच्या बोटींचा पर्याय उपलब्ध असेल. सध्या ज्या फेरीबोट सुरु आहेत, त्यात जास्त प्रवासी आणि कमी वेग असल्यामुळे या 'उबरबोट'ला चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. स्पीडबोट सेवा सर्वात सुरक्षित असल्याचा दावाही उबरने आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला.