मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी युतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी परत गळ घातल्याची माहिती आहे. 'लवकरात लवकर युतीचा निर्णय घ्यावा, हिंदुत्वासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे' असं सांगत शाहांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली.

अमित शाहांच्या फोननंतर शिवसेना-भाजपमध्ये युतीबाबत हालचालींचा वेग वाढला. शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बैठकांचा जोर वाढल्याची माहिती आहे.

शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही, याबाबत अद्याप कुठलीच स्पष्टता नाही. कधी शिवसेनेकडून स्वबळाची भाषा होते, तर कधी संजय राऊत 'मोठा भाऊ किंवा वडील' अशा बदलत्या भूमिकेत जात युतीचे संकेत देतात. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीसांनीही 'भाजप लाचार नाही, पण युतीला तयार आहे' असं म्हणत हात पुढे केला आहे.

दुसरीकडे, युती व्हावी, अशी लोकांची इच्छा असली, तरी युतीबाबतचा निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, अशी माहिती शिवसेना नेते आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईत दिली.