भिवंडी : भिवंडी कल्याण बायपास मार्गावर असलेल्या रांजनोली येथील टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या 15 व्या मजल्यावर कोरोनाबाधित असलेल्या २ अट्टल कैद्यांवर उपचार सुरु असतानाच या दोन्ही कैद्यांनी बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढत 15 व्या मजल्यावरून बाथरूमच्या पाईपवरून खाली उतरून पसार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे.
याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दोघा फरार आरोपींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरु केला आहे. गाजीदारा जाफरी (वय, 25) खुर्शीद अब्दुल हमिद शेख (वय 33) असे फरार झालेल्या दोन कैद्यांची नावे असून चोरी, चॅन स्नेचिंग, घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत. आरोपी फरार झाल्याने कार्यरत असलेल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या 30 कैद्यांना काही दिवसापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाबाधित या सर्व कैद्यांची उपचारासाठी ठाणे येथील सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातच फरार झालेले गाजीदारा जाफरी आणि खुर्शीद या दोघांचाही शिक्षा भोगत असताना कारागृहात 19 एप्रिलला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या दोघांना उपचारासाठी कल्याण - भिवंडी मार्गावर रांजणोली नाका बायपास येथील टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या 15 व्या मजल्यावर उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असल्याचा फायदा घेत, 15 मजल्यावरच्या रूममधील बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून त्यातून बाहेर पडत पाईपवरून खाली येत पळ काढला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी या फरार कैदयांचा शोध सुरु केला असून कार्यरत असलेले चार पोलीस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे