डोंबिवली: मायक्रो चिपद्वारे होत असलेल्या पेट्रोलचोरीचा गुन्हे शाखेनं नुकताच पर्दाफाश केला होता. यानंतर आता पासवर्ड टाकून केली जाणारी पेट्रोलचोरी गुन्हे शाखेने उघड केली आहे. या कारवाईत डोंबिवली आणि बदलापूरमधील दोन पेट्रोल पंपांना सील ठोकण्यात आलं आहे.


चिपद्वारे होत असलेली पेट्रोलचोरी पकडण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेकडून राज्यभरात धाडसत्र सुरू आहे. या कारवाईत आत्तापर्यंत राज्याच्या विविध भागातले ८ पेट्रोलपंप सील करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासात डोंबिवलीच्या काटई नाका भागात असलेल्या साई पेट्रोल पंप आणि बदलापूरच्या कात्रप भागात असलेल्या शिव पेट्रोल पंपांवर पेट्रोल चोरी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार या दोन्ही पंपांवर धाडी टाकण्यात आल्या.

यावेळी मशीन्समध्ये चिप सापडल्या नसल्या, तरी दोन्ही ठिकाणी पेट्रोलचोरी होत असल्याचं उघड झालं. पेट्रोल किंवा डिझेल भरताना मूल्य सेट करण्यापूर्वी एक विशिष्ट पासवर्ड टाकण्यात येतो. यामुळे प्रत्येक ५ लीटरमध्ये ५ टक्के, म्हणजे २५० मिली पेट्रोलची चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळं पोलिसांनी हे दोन्ही पंप सील केले असून पंपमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.