मुंबई : मुंबईत होणारा आगामी मराठा मोर्चा हा पुढे ढकलल्याची बातमी आली आणि अवघ्या महाराष्ट्रातून उलटसुलट चर्चांना सुरु झाली. मात्र, आता मुंबईतल्या बैठकीत झालेल्या या निर्णयाला फेटाळत उर्वरित महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा 31 जानेवारीलाच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुंबईतल्या परळमध्ये आज बैठक झाली. त्यात आगामी महापालिका, आचारसंहिता या गोष्टींचा विचार करुन मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत मुंबईतल्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले नव्हते. त्यामुळे परिस्थितीचा विचार करता हो निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. शिवाय, मोर्चा कधी काढायचा याचा निर्णय 15 जानेवारी रोजी बोलावलेल्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

पण जेव्हा ही बातमी माध्यमांमध्ये आली. तेव्हा उर्वरित राज्यातल्या नेत्यांनी मात्र हा मोर्चा नियोजित तारखेला म्हणजे 31 जानेवारीलाच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे मुंबईतल्या मोर्चाच्या तारखेवरून मराठा संघटनांमध्ये दोन वेगवेगळे सूर पहायला मिळत आहेत.