मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीत मेटेंनी भाजपच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे, मात्र नाराजी आणि या भेटीचा काहीही संबंध नसल्याचा दावा मेटेंनी केला आहे.

शिवसेना-भाजपने सोबत निवडणुका लढवाव्या आणि आम्हालाही सोबत घ्यावं, अशी आम्हा सर्व घटकपक्षांची भावना आहे. मात्र आम्हाला सोबत घेतलं नाही, तर जिथं कुठं शक्य असेल तिथं आम्हाला निवडणुका लढवाव्याच लागतील, असं मेटे म्हणाले.

26 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जिथं आमची ताकद आहे, तिथं जागा द्या, अन्यथा आम्हालाही वेगळा पर्याय निवडावा लागेल, असा प्रस्ताव भाजपला दिल्याची माहिती मेटेंनी दिली.

महाराष्ट्रातल्या विषयात आम्हाला विश्वासात घेऊन सन्मानाची वागणूक भाजपने दिली पाहिजे. उद्धव ठाकरेंनाही मान-सन्मान दिला जातो का, हे महाराष्ट्राला माहित आहे, असा टोलाही मेटेंनी लगावला.