मुंबई : तोतया पोलीस बनून परदेशी नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्रकार मुंबईत अनेकदा घडले आहेत. परंतु परदेशी नागरिकांनी मुंबई पोलीस बनून लोकांना लुटल्याचा प्रकार विक्रोळी येथे उघडकीस आला आहे. विक्रोळी पोलिसांनी दोन इराणी देशाच्या नागरिकांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या दोघांनी मुंबई पोलीस असल्याचे सांगत येमेन देशाच्या परदेशी नागरिकाला लुटले होते. जोहरी पेमन अकबर, अली फिरोज हमिदानी अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

येमेन देशाचे नागरिक असलेले आणि येमेन देशाच्या सैन्यात मोठ्या हुद्द्यावर असलेले अली एद्रोस नासिर सालेह हे मुलुंड येथील फोर्टीज रुग्णालयात उपचारासाठी वारंवार येतात. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. त्यावर ते सध्या उपचार घेत आहेत.

19 जानेवारी रोजी अली एद्रोस फोर्टीज रुग्णालयात आपल्या पत्नीसह आले. उपचार करून टॅक्सीने परतत असताना त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले (इराणी देशाचे नागरिक असलेले) हे आरोपी एका काळ्या रंगाच्या खासगी मोटार कार ने अली एद्रोस यांचा पाठलाग करु लागले. पूर्व द्रुतगती मार्गावर भांडुप पंपिंग स्टेशन जवळ आरोपींनी अली एद्रोस त्यांची टॅक्सी अडवली.

आपण मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चचे अधिकारी असून तुमच्याकडे अमली पदार्थ आहेत. त्यामुळे गाडीची झडती घ्यायची आहे, असे त्यांनी सांगितले. ही झडती घेत असताना त्यांनी अली एद्रोस यांच्या पत्नीच्या हातातील बॅग घेतली ज्यात 2 लाख 84 हजार रुपये इतक्या भारतीय किंमतीचे चार हजार अमेरिकन डॉलर रोख स्वरुपात होते. ते घेऊन त्यांनी तिथून पळ काढला.

याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच विक्रोळी पोलिसांनी 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याद्वारे त्यांना हे आरोपी अंधेरी विभागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन वेगवेगळ्या हॉटेल्समधून या ईराणी नागरिक असलेल्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 600 अमेरिकन डॉलर ताब्यात घेण्यात आले आहे.