ठाणे : कोरोना काळात रुग्णांसोबत मनमानी वर्तन करणे ठाण्यातील दोन खाजगी रुग्णालयांना चांगलेच भोवले आहे. अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यासह नाहक भीती दाखवून रुग्णांना दाखल केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेने ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन खाजगी रुग्णालयांना जवळपास 16 लाख रुपये दंड आकारला आहे. बहुदा,राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या या रुग्णालयांविरोधात तक्रारी आल्या होत्या. त्याची शाहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोणताही आजार नसताना ठाण्यातील ठाणे हेल्थ केअर आणि सफायर या दोन रुग्णालयांनी अनेक रुग्णांना दाखल करुन त्यांच्याकडून लाखोंची बिले आकारली होती. याबाबत तक्रारी आल्यावर ठाणे महापालिकेने चौकशी करुन ही कारवाई केली आहे. दरम्यान, याआधी कोरोना टेस्ट करणाऱ्या थायरोकेअर नामक खाजगी लॅबवरही ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे.


गरज नसताना रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेऊन त्यांना सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. एका रुग्णालयाने तीन रुग्णांना कारण नसताना दाखल करुन घेतलं आणि सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवलं. तर दुसऱ्या रुग्णालयाने 13 रुग्णांना कारण नसताना दाखल करुन घेतलं आणि सात दिवसांपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात ठेवलं. या कारणास्तव दोन्ही रुग्णालयांना दंडाची नोटीस दिली असल्याच माहिती माळवी यांनी दिली.


ठाण्यातील कोरोनाची सद्यस्थिती


ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची आज संख्या 138 ने वाढली आहे. आत्तापर्यंत ठाण्यात एकूण 4061 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 93 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 1843 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह आतापर्यंत मृतांची संख्या 116 वर पोहोचली आहे. सध्या 2098 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


Corona Ground Report | महाराष्ट्राच्या गावागावातून कोरोना परिस्थितीचा ग्राऊंड रिपोर्ट