मुंबईत वांद्र्यामध्ये झोपड्यांना आग, अग्निशमनच्या 12 गाड्या घटनास्थळी
एबीपी माझा वेब टीम | 09 Nov 2018 12:20 AM (IST)
वांद्रे स्टेशनबाहेर असलेल्या कुरेशीनगरमध्ये रात्री 11.15 वाजताच्या सुमारास काही झोपड्यांमध्ये आग लागली.
मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या शास्त्रीनगर-कुरेशीनगरमधील झोपड्यांना भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. वांद्रे स्टेशनबाहेर असलेल्या कुरेशीनगरमध्ये रात्री 11.15 वाजताच्या सुमारास काही झोपड्यांमध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत असून त्यामध्ये सात वॉटर टँकर्सचा समावेश आहे. स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी परिसर रिकामा केला. आगीचं नेमकं कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करुन आगीविषयी माहिती दिली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं शेलार यांनी सांगितलं.