मुंबई : ऑनलाईन पद्धतीने नोकरी शोधणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकांना ऑनलाईन नोकरी शोधण्यात यश येते, मात्र योग्य पडताळणी न केल्यास फसवणूक होते. ऑनलाईन पद्धतीने एअर हॉस्टेसची नोकरी शोधणाऱ्या पवईतील दोन मुलींची लाखोंची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नासिर शेखला अटक केली आहे.
फसवणूक झालेलल्या दोन मुलींनी क्विकर डॉट कॉमवर एअर हॉस्टेसच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. फातिमा शेख आणि निकिता वर्मा या तरुणींनी क्विकर डॉट कॉम वेबसाईटवर नोकरीसाठी आपला बायोडेटा अपलोड केला होता. त्यावेळी नासिर शेख या तोतयाने या मुलींना जेट एअरवेज या विमान कंपनीत नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं.
नासिरने फोनवरून या दोन्ही मुलींना आपण जेट एअरवेजमध्ये एचआर मॅनेजर असल्याची थाप मारली होती. नोकरीसाठी या भामट्यानं दोन्ही मुलींकडे पैशांची मागणी केली. दोन्ही मुलींनी नासिरला नोकरीच्या आशेपोटी प्रत्येकी दोन लाख रुपये दिले. त्यानंतर नासिरने मुलींना विश्वास बसावा यासाठी दोघींना जेट एअरवेजचं बोगस जॉईनिंग लेटर दिलं, त्यांच मेडिकल चेक अप केलं आणि वारंवार एअरपोर्टवर बोलावलं.
मात्र बरेच दिवस असं सुरु राहिल्यानं मुलींना संशय आला. त्यानंतर त्यांनी जेट एअरवेज कंपनीशी संपर्क साधला आणि माहिती मिळवली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं या मुलींच्या लक्षात आलं.
त्यानंतर दोघींनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि फसवणुकीची तक्रार नोंदवली. मुलींच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नासिर शेखला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.