मुंबई: घरपोच दारु नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला. महाराष्ट्र सरकार ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देऊन, दारुच्या होम डिलिव्हरीला ग्रीन सिग्नल देणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करुन सरकारवर हल्ला चढवला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “घरपोच ऑनलाईन दारु पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक आहे. घरपोच दारुच्या बाटल्या पोहोचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा”.

इतकंच नाही तर, ऑनलाईन दारु देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. पण राज्याची ‘शोभा’ करण्याचे प्रकार रोजच सुरु असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयानक आहे. मंत्री फिरत आहेत. त्यांचे अहवाल येतील तेव्हा येतील. केंद्राकडे मदतीसाठी याचना होतील. दुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करुन मारु नका.  त्यांना घरपोच दारु नकोय तर मदत हवीय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.


उत्पादन शुल्कमंत्री बावनकुळे यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दारु ऑनलाईन घरपोच देण्याबाबत राज्याचं कोणतंही धोरण नाही, असं स्पष्ट केलं.

ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी द्या असे अर्ज सरकारकडे आले आहेत, मात्र सरकारने सध्या या अर्जावर कोणताही विचार केलेला नाही, असं स्पष्टीकरण उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

संबंधित बातम्या 

ऑनलाईन मद्यविक्रीबाबत बावनकुळे म्हणतात...