ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी पुलाच्या निर्मितीसाठी या आठवड्याच्या अखेरीस दोन दिवस रात्र कालीन मेगाब्लॉक घेण्यात येईल. शनिवारी आणि रविवारी रात्री प्रत्येकी सात तासांचे हे मेगाब्लॉक असतील. या दरम्यान सर्व वाहने वेगवेगळ्या मार्गांवरून डायव्हर्ट करण्यात येतील. याबाबत ठाण्याच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढले आहे. या मेगाब्लॉकमुळे वाहनचालकांना आता जरी त्रास होणार असला तरी येणाऱ्या भविष्यात या नवीन पुलाच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.


ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर जुना कोपरी पूल आहे. या पुलाच्या जागी केवळ चार मार्गिका असल्याने नेहमीच पूर्व द्रुतगती महामार्गावर या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळेच या पुलाच्या दुतर्फा दोन मार्गिका वाढवून त्यासोबत जुना झालेला कोपरी पूल पाडून त्या जागी नवीन पूलांची निर्मिती करण्याचे काम गेले दोन वर्षे सुरू आहे. यापैकी पहिल्या टप्प्याचे म्हणजेच दोन्ही बाजूला नवीन मार्गिका तयार करण्याचे काम हे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पूर्ण झालेले आहे. मात्र ते पूर्णत्वास नेण्यासाठी या जागी लोखंडी गर्डर उभारले जाऊन त्यावर रस्ता बनवला जाणार आहे. या गर्डर च्या उभारणीसाठी दोन दिवस रात्र कालीन मेगा ब्लॉक घेण्यात येत आहेत.


कसा आणि कधी असेल हा मेगाब्लॉक?


हा मेगाब्लॉक शनिवारी रात्री म्हणजेच सोळा तारखेला रात्री अकरा वाजल्यापासून ते रविवारी म्हणजेच 17 तारखेला सकाळी सहा वाजेपर्यंत असेल. तर रविवारी रात्री म्हणजेच 17 तारखेला अकरा वाजता पासून ते सोमवारी सकाळी 18 तारखेला सहा वाजेपर्यंत दुसरा मेगाब्लॉक घेण्यात येईल. या दरम्यान संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे लवकरच अरुंद कोपरी पुलाच्या कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार असून मुंबईकडून ठाण्याकडे येताना व जाताना दोन्ही मार्गिका सुसाट होणार आहेत.


कोणाला बसेल फटका?


तिकडे लोकल बंद आहेत त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आहे. अशातच पूर्व द्रुतगती महामार्ग बंद ठेवला तर रात्री उशिरा कामावरून परतणऱ्या आणि सकाळी लवकर कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसू शकतो. जे मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत ते देखील निमुळते असल्याने तिथेही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.


कोणते मार्ग उपलब्ध आहेत ?


ठाण्याहून मुंबईत जाणाऱ्या वाहनांकरिता




  •  ठाण्याहून पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईत जाणाऱ्या हलक्या वाहनांना साकेत कट, महालक्ष्मी मंदीर, साकेत मार्ग, क्रिकनाका, शिवाजी चौक, कळवा, विटावा, ऐरोली मार्गे अथवा तीन हात नाका येथून एलबीएस, मुलुंड पश्चिममार्गे आणि तीन हात नाका, गुरुद्वारा सेवा रस्ता, कोपरी चौक, बाराबंगला, माँ बाल निकेतन विद्याालय, आनंदनगर नाका मार्गे जाता येईल.

  • जड वाहनांना खारेगाव टोलनाका, गॅमन चौक, मुंब्रा बाह्यवळण, महापे नवी मुंबई मार्गे, रबाळे, ऐरोली येथून जाता येईल.
    - गुजरातहून घोडबंदर मार्गे मुंबईत जाणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाका, अंजूरफाटा, मानकोली, खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा, महापे, ऐरोली मार्गे जाता येईल.


मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या वाहनांकरिता




  • हलक्या वाहनांना ऐरोली-जक्शंन, कोपरकर चौक, फोर्टीज रुग्णालय, सोनापूर जंक्शन, एल.बी.एस रोड, मॉडेला चेकनाका, तीन हात नाका मार्गे ठाण्यात येणे शक्य होईल.

  •  हलक्या वाहनांना नवघर रोड, कॅम्पास हॉटेल, ईस्ट वेस्ट रेल्वे पूल येथून वळण घेऊन एसीसी सिमेंट रोड, महाराणा प्रताप चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मॉडेला चेकनाका, तीन हात नाका येथे येता येईल. अथवा मुलुंड टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन निलमनगर नाका, अग्निशमन केंद्र, ईस्ट वेस्ट रेल्वे पूल येथून वळण घेऊन, महाराणा प्रताप चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मॉडेला चेकनाका, तीन हात नाका येथे येता येईल.

  • जड वाहनांना ऐरोली, रबाळे, दिवा गाव सर्कल, खेडेकर चौक, टी पॉईंट जक्शन, रबाळे नाका, महापे, शिळफाटा येथून मुंब्रा बाह््यवळण मार्गे, खारेगाव, माजीवडा किंवा भिवंडीच्या दिशेने पुढे जाता येईल.


पुढच्या आठवड्यात पुन्हा असेल मेगाब्लॉक


ह्या आठवड्यात मेगाब्लॉक पार पडल्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले आहे. 23 आणि 24 जानेवारीला रात्री प्रत्येकी 7 तासांचे हे मेगा ब्लॉक असतील. तेव्हा रेल्वे मार्गावरील काम पूर्ण केले जाईल.