मुंबई : ओव्हरहेड वायर आणि सिग्नल दुरुस्तीसारख्या विविध अभियांत्रिकी कामांसाठी आज रविवार (21 मे) रोजी मध्य, हार्बर, आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.


आज मध्य रेल्वेच्या वतीने ठाणे ते कल्याणपर्यंतच्या जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 या काळात या मार्गावरील वाहतूक बंद राहील. या कालावधीत सीएसटीहून सुटणाऱ्या जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकात थांबतील. तर ठाण्यानंतर जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

तर हार्बरवरील कुर्ला ते वाशीदरम्यान दोन्ही दिशांच्या मार्गांवर सकाळी 11 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यान दोन्ही दिशांच्या मार्गांवरील लोकल रद्द केल्या जातील. सीएसटी ते कुर्ला व वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.

पश्‍चिम रेल्वेवरील बोरिवली ते नायगावदरम्यान दोन्ही दिशांच्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या सर्व गाड्या विरार, वसई ते बोरिवलीपर्यंत जलद मार्गावर आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या गोरेगाव ते वसई, विरार स्थानकापर्यंत जलद मार्गावर चालवण्यात येतील.