विरार : भविष्यात चुका होऊ नये म्हणून आपण इतिहास शिकतो. मात्र भावी पिढीलाच चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. तानाजी मालुसरे यांचं टोपण नाव सिंह होतं. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ कोंढाणा किल्ल्याचं नाव 'सिंहगड' ठेवल्याचा जावईशोध चौथीच्या पुस्तकात लावला आहे.
विरारमधल्या नॅशनल इंग्लिश हायस्कूलनं इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांसाठी नवी दिल्लीतील न्यू सरस्वती
हाऊस प्रा.लि. मधून ही पुस्तकं मागवली होती. आयसीएसई बोर्डाची पुस्तकं मागवण्याचा अधिकार शाळेला आहे. त्यातील एका धड्यात हा आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे.
या प्रकरणी शिवसैनिकांनी शाळा प्रशासनाला चूक लक्षात आणून दिली. पण शिवसेनेनं ह्या चुकीचं थेट कनेक्शन उत्तर भारतीयांपर्यंत जोडलं.
शिवसेनेनं इशारा दिल्यानंतर शाळेनं चूक मान्य केली आणि पुस्तकाच्या प्रती विद्यार्थ्यांकडून पुन्हा मागवल्या. त्यावर सुधारित मजकुर चिटकवण्यात आला आहे.
खरं तर भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांची सांगड घालतो तो इतिहास. इतिहासातील धडे पाहून भविष्यात सुधारणा करायच्या असतात. पण इथं विद्यार्थ्यांनाच इतिहासाचे चुकीचे धडे दिले जात असतील तर अशा बहाद्दरांवर कड कारवाई करायला हवी.