ठाणे : आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असतानाही निगेटिव्ह देण्याचा प्रकार ठाण्याच्या वाडिया रुग्णालयात उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाने कंत्राटी आरोग्य विभागातील कर्मचारी अफसर तेजपाल मंगवाना या वॉर्डबॉयला अटक केली. त्यानंतर आणखी एक आरोपी संकपाल भास्कर धवणे (रा. मुंब्रा, सम्राटनगर) याला अटक करण्यात आली. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मात्र दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


अवघ्या 1200 ते 1500 रुपयांमध्ये ठाणे महापालिकेच्या वाडिया रुग्णालयात निगेटिव्ह अहवाल बनवून देणारे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आल्यानंतर, गुन्हे शाखेने कारवाई करुन तेजपाल मंगवाना या आरोपीला अटक केली होती. त्याची अधिक चौकशी केली असता आरोपी संकपाल भास्कर धवणे याचे नाव समोर आले. हे दोघे आरोपी हे एखाद्याला कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल हवा असल्यास 1200 ते 1500 रुपयांमध्ये स्वॅब न घेता त्याच्या आधारकार्डच्या मदतीने देत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 


ते कर्मचारी महापालिकेचे नाही, ठेकेदाराचे : मनपा आयुक्त  
बनावट आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल प्रकरणाबाबत महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांना विचारणा केली असता त्यांनी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. सोबतच या प्रकरणात अटक केलेले आरोपी हे महापालिकेच्या वाडिया रुग्णालयाचे कर्मचारी नसून कंत्राटी ठेकेदारांचे कर्मचारी आहेत. रोज हजारो कोविड आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल असतात त्यामुळे त्यावर स्कॅनिंग सहीचा वापर करण्यात येतो. त्याचाच गैरफायदा या कर्मचाऱ्यांनी घेतला आणि त्यातूनच हा प्रकार घडला. पार्किंग प्लाझामध्ये आरटी-पीसीआर अहवाल देत नाही किंवा चाचणीही करत नाहीत. पालिकेच्या वाडिया रुग्णालयातून अहवाल देण्यात येतात. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी दिली.