मुख्यमंत्री कार्यालयासमोर दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2016 12:10 PM (IST)
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबादेतील शेतकरी दिलीप मोरे यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. औरंगाबादेतून आलेल्या दिलीप मोरेंना मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदत हवी होती. आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर पोहचाव्यात यासाठी त्यांनी कार्यालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तात्काळ जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसरीकडे, मुलुंडमध्ये राहणारे दिनेश पडाया यांनी मंत्रालयात येण्याच्या अर्धा तास अगोदर गोळ्या खाल्ल्याचा दावा केला. पडायांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्यांनाही सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिनेश यांना एसआरए संदर्भात काही समस्या होत्या. सध्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दिलीप मोरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.