मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 47 वा वाढदिवस आहे. मात्र राज ठाकरेंनी वाढदिवसाचा केक वेगळ्या पद्धतीने कापला. राज यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचा चेहरा असलेला केक कापला.
सुरुवातीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या चेहऱ्याचा केक राज ठाकरेंसमोर आणला. राज यांनी या केकचं कटिंगही केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी या केकचे तुकडे केले.
याआधी राज्याचे माजी महाधिवक्ते आणि वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्रातून विदर्भाचा तुकडा कापला होता. त्यावरुन राज ठाकरेंनी श्रीहरी अणेंवर जोरदार टीकाही केली होती.
आता स्वत: राज ठाकरेंनी असदुद्दीन ओवेसी यांचा चेहरा असलेला केक कापल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.