अंबरनाथ : फरीदा खान हिला परदेशात पाठवणाऱ्या दोन एजंट्सना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. इमरान शेख आणि इकबाल शेख अशी दोन एजंट्सची नावं आहेत.
राज्य महिला आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. एबीपी माझाने फरीदाची बाजू लावून धरल्यानंतर कारवाईने वेग घेतला होता.
प्रकरण काय आहे?
मोठ्या पगाराच्या आमिषानं हल्ली अनेकजण आखाती देशात नोकरी करण्यासाठी जातात. मात्र तिकडे गेल्यानंतर काम करताना कशाप्रकारे अनन्वित छळ केला जातो, याचं उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आलं आहे.
परदेशात नोकरी करणं हे हल्ली भूषण मानलं जातं. मोठा पगार आणि परदेशात राहण्याचं आकर्षण याला भुलून अनेक जण परदेशात आणि त्यातही आखाती देशात नोकरी करण्यासाठी जातात. मात्र तिकडे गेल्यानंतर कशाप्रकारे छळ केला जातो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अंबरनाथची फरीदा खान.
अंबरनाथच्या बुवापाड्यात राहणाऱ्या फरीदाच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे परदेशात काही वर्ष काम करून परिस्थिती सुधारेल, या आशेनं तिनं एका एजंटच्या मदतीनं काही महिन्यांपूर्वी दुबई गाठलं. तिथून तिला ओमानमधील मस्कतला नेऊन अहमद कपिल नामक व्यक्तीच्या घरी घरकामाला ठेवण्यात आलं. मात्र 17 खोल्यांच्या अवाढव्य घराची साफसफाई, त्यातल्या 20-25 माणसांच्या जेवणापासून कपडे धुणं, भांडी घासणं, गाड्या धुणं अशी सगळी कामं तिच्या एकटीवर टाकण्यात आली.
एकट्या बाईला इतकी कामं करणं अशक्यच होतं, मात्र तरीही काही दिवस फरीदानं हे निमूटपणे सहन करत काम केलं. मात्र कामात छोटीशीही चूक झाली तरी शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवून छळ करणं असे प्रकार होऊ लागल्यानंतर फरीदा धास्तावली.
या सगळ्या छळाला कंटाळून तिनं काम सोडून भारतात परतण्याची मागणी केल्यानंतर तर तिचं तिच्या घरच्यांशी बोलणंही बंद करण्यात आलं. त्यामुळं काळजीत पडलेल्या तिच्या घरच्यांनी इकडे राज्य महिला आयोग आणि परराष्ट्र खात्याकडे मदतीची याचना केली. त्याची दखल घेत ओमानमधील भारतीय उच्चायुक्तांनी फरीदाची शोधाशोध सुरु केल्यावर तिच्या मालकानं घाबरुन तिची सुटका केली आणि एजंटच्या मदतीनं तिला भारतात माघारी धाडलं.
या सगळ्यानंतर आता पैशांच्या हव्यासापोटी आखाती देशात कुणीही जाऊ नका, असं आवाहन फरीदा करतेय याप्रकरणी लोकांना फसवून आखाती देशात गुलाम म्हणून पाठवणाऱ्या स्थानिक एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्याची तिची मागणी आहे. शिवाय आखाती देशात अशाप्रकारे अनेक भारतीय लोकांना गुलाम म्हणून डांबून ठेवल्याचंही फरीदा सांगते.
संबंधित बातम्या : अंबरनाथच्या महिलेची ओमानच्या नरकयातनेतून सुटका
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणारे एजंट अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 May 2018 02:39 PM (IST)
राज्य महिला आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. एबीपी माझाने फरीदाची बाजू लावून धरल्यानंतर कारवाईने वेग घेतला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -