मुंबई : मध्य रेल्वेवर कुर्ला ते सायन स्थानकांमध्ये असलेला पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला.
त्यामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील लोकल, एक्स्प्रेस यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत.


शनिवारी रात्री हार्बरच्या दोन्ही मार्गांवर म्हणजेच मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गावर रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 5.30 पर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला, तर मध्य रेल्वेच्या डाऊन जलद आणि अप-डाऊन धीम्या मार्गावर रात्री 1.30 ते पहाटे 3.30 पर्यंत ब्लॉक घेतला गेला होता.

या कालावधीत हार्बर आणि मध्य रेल्वेवरील लोकल, एक्स्प्रेस यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले. ब्लॉकमध्ये हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द स्थानकांमध्ये दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद केली गेली.

मेल-एक्स्प्रेसवर परिणाम

पुणे-सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन, मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या आज रद्द केल्या गेल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होणार आहे

अमृतसर-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी मुंबई फास्ट पॅसेंजर, कन्याकुमारी-सीएसएमटी जयंती-जनती एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मुंबई मेल, गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस गाड्या दादरपर्यंतच चालवल्या जातील.

रविवारी सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस सकाळी 9.05 वाजता आणि सीएसएमटी-केएसआर बंगळुरु उद्यान एक्स्प्रेस सकाळी 10.10 वाजता सुटणार आहे. याशिवाय रविवारी मुंबईत येणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्या उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी गाड्यांच्या वेळेची खात्री करुनच बाहेर पडण्याची गरज आहे.