मुंबई: महाराष्ट्रातील रखडलेल्या शिक्षक भरतीवरुन शिक्षणमंत्री विनोद तावडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे असा सामना सोशल मीडियावर रंगला आहे. ट्विटवरुन आज या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक युद्ध रंगलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून #जवाबदो या हॅशटॅग अंतर्गत मोहिमे सुरु केली आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी शिक्षक भरतीचा मुद्दा घेऊन ट्विट केले. त्याला विनोद तावडे यांनी उत्तर दिलं. VIDEO:  मुंबई : आगामी सहा महिन्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा भरणार : विनोद तावडे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं ट्विट

राज्यात 24 हजार शिक्षकांच्या रिक्त जागा सहा महिन्यांत भरण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फेब्रुवारीत केली होती. अद्याप ही शिक्षक भरती झालेली नाही. दिवसरात्र या भरती परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत? #जवाबदो  असं ट्विट खासदार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलं.


विनोद तावडे यांचं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ट्विटला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवरुन उत्तर दिलं.

"15 वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी एकही पद भरले नाही. आज बहुतांश संस्थांचालक यांचेच आहेत. जे कोर्टात जाऊन सरकारच्या ऑनलाईन भरतीवर स्थगिती आणतात. मराठा आरक्षण हा मुद्दा आणून भरती पुढे ढकलतात. वर यांचेच नेते शिक्षक भरती होत नाही अशी सोशल मिडीयावर टिवटिव करतात.

शिक्षणात राजकारण केलेले खपवून घेणार नाही. संस्थाचालकांनी कितीही प्रयत्न केले आणि विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी आमचे सरकार शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी खंबीरपणे उभे आहे. पद भरती होणार होणार होणार!"  असं ट्विट विनोद तावडे यांनी केले.




विनोद तावडेंनी ‘माझा कट्ट्या’वर बोलताना फेब्रुवारीमध्ये सहा महिन्यात शिक्षक भरती होईल, असा दावा केला होता. मात्र अद्यापही शिक्षक भरती रखडलेली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी विरुद्ध विनोद तावडे असा सामना ट्विटरवर रंगला आहे.





संबंधित बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीच 1300 शाळा बंद केल्या : विनोद तावडे 

सहा महिन्यात 24 हजार शिक्षकांची भरती करणार : विनोद तावडे