दरम्यान, 24 हेक्टर्स जागेवरील मुलुंड डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली आहे. या डम्पिंग ग्राऊंडमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून होत होती. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. हे डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्याने इथल्या रहिवशांनी आनंद व्यक्त केला आहे.
गेल्या दीड वर्षापासून मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी महापालिकेला ठेकेदारच मिळत नव्हता. अखेर ठेकेदार मिळाल्याने हे डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात येणार आहे. सध्या मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर दीड ते दोन हजार मेट्रिक टन कचरा टाकला जात आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानंतर हा कचरा देवनार आणि कांजूरमार्ग येथे वळविण्यात येणार आहे.
मुलुंड कचराभूमीवरील 70 लाख मेट्रिक टन कचरा उपसण्यासाठी महापालिकेने जूनमध्ये ठेकेदार नेमला. त्यानुसार पुढील सहा वर्षात 731 कोटी रुपये खर्च करुन, टप्प्याटप्प्याने मुलुंड कचराभूमी बंद करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरात महापालिकेने हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतून जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण दोन हजार 300 मेट्रिक टन एवढे घटले आहे. त्यामुळे आता दररोज सुमारे सात हजार 200 मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा मुलुंड, कांजूर आणि देवनार कचराभूमीवर टाकण्यात येतो.