भिवंडी : भिवंडीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर उभी असलेली पोलीस चौकी चोरीला गेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा प्रताप केला असल्याचे समोर आले आहे. भिवंडीतील तीन बिल्डर्सला या राखीव जागेवर टोलेजंग इमारत उभी करायची आहे. त्यामुळे बिल्डरांनी पालिका कर्मचाऱ्यांशी संगनमत करून निजामपूरा भागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बांधण्यात आलेली पोलीस चौकी जेसीबी सहाय्याने उद्धस्त केली आहे. सोबतच रात्रीच्या अंधारता बांधकामाचे दीड लाखाचे मटेरियल चोरून नेले आहे.


शहरातील निजामपूर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर उभी असलेली बौद्धवाडा पोलीस चौकीच पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर त्रिकूटाने हडपण्याचा प्रयत्न केला आहे. या राखीव जागेवर टोलेजंग इमारत उभारण्याच्या मनसुब्याने जेसीबी व डंपरच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे पोलीस चौकी उध्वस्त करून येथील दीड लाखाचे मटेरियल चोरून नेले आहे.

बिल्डर त्रिकुटासह पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा
या सरकारी मालमत्तेच्या नुकसान प्रकरणी निजामपूर पोलिसांनी बिल्डर त्रिकुटासह पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर मुद्दसीर नदीम बर्डी, फैजल रशीद अबूजी ,मुनवर गुलाम रसूल शेख व पालिका कर्मचारी नईम मेहबूब शेख (मुकादम ) ,समशूजमा मोहम्मद ईसा अंसारी,मुजाहिद अंसारी असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत.

ही गंभीर बाब जागरूक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी निजामपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा करून या सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवून पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी नईम मेहबूब शेख (मुकादम ) ,समशूजमा मोहम्मद ईसा अंसारी या दोघांना अटक केली आहे.

पोलीस चौकी काही वर्षांपासून बंद
बौद्धवाडा पोलीस चौकीची जागा सन 1954 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून या जागेपैकी 236 स्क्वेअर चौ.मी.जागा 1986 साली पोलीस चौकीसाठी दिल्याने या ठिकाणी निजामपूर पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी उभारली होती. मात्र सदर पोलीस चौकी काही वर्षांपासून बंद असल्याने त्या जागेवर बिल्डर लॉबीने डोळा ठेवून पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा डाव उघड झाला आहे.