मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताने सुरु केलेल्या #Metoo वादळाच्या तडाख्यात आता प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी सापडले आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस, 3 इडियट्स, पीके आणि संजूसारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी मार्च ते सप्टेंबर 2018 या कालावधीत लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. हे आरोप एका मेलद्वारे करण्यात आले असून संबंधित महिलेने हिरानी यांच्याबरोबरच दिग्दर्शक, निर्माते विधू विनोद चोप्रा यांनाही हा मेल पाठवला आहे.


‘संजू’ सिनेमाची सहायक दिग्दर्शक असलेल्या या महिलेने  हिरानी यांनी घरी आणि ऑफिसमध्ये लैंगिक शोषण केले असल्याचा आरोप मेलद्वारे केला आहे. मात्र हिराणी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीसाठी देखील तयार असल्याचे हिरानी यांनी म्हटले आहे.

या महिलेने चित्रपट समिक्षिका अनुपमा चोप्रा, पटकथा लेखक अभिजित जोशी आणि विधू विनोद यांची बहिण शेली चोप्रा यांनाही हा आरोपांचा मेल पाठवला आहे. हिरानी यांनी आपल्यावर अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर एप्रिलमध्ये त्यांनी माझे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. आपण या शोषणाला विरोध केल्यानंतर आपल्याकडून चित्रपट काढून घेतला जाईल अशी धमकीही हिरानी यांनी दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

आपल्याकडे असणारे काम आपल्याला घालवायचे नसल्याने आपण त्यावेळी आवाज उठवला नाही असेही या महिलेने म्हटले आहे. एका रात्री माझ्याशी करण्यात आलेल्या गैरवर्तणुकीमुळे मी पूर्णपणे खचून गेले. हे पुढील सहा महिने सुरु होते, असे या महिलेने म्हटले आहे.

दुसरीकडे आपल्यावर करण्यात आलेले आरोप अतिशय खोटे असल्याचे राजकुमार हिरानी यांनी म्हटले आहे. हे बदनामीसाठी आणि खोडसाळपणा म्हणून करण्यात आले असून यांच्या पूर्ण चौकशीसाठी मी तयार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर सुरु असलेलं #Metoo अभियान काय आहे?