मुंबई : महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला उत्तम आरोग्य सुविधा आणि सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत हे आमचे ध्येय आहे. राज्य सरकारच्या अखत्यारितील मुंबईस्थित विविध रुग्णालयांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न सरकारच्या वतीने सुरु असून सार्वजनिक आरोग्य विभागाने मुंबईस्थित रुग्णालयांच्या सुविधा वाढवण्यावर भर द्यावा, अशी सूचना आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.


राज्य सरकारच्या अखत्यारितील मुंबईस्थित विविध रुग्णालयांच्या समस्यांबाबत शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेत यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुंबईतील सेंट जॉर्जेस आणि गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसरात तुळस व अन्य औषधी वनस्पतींची लागवड करून नैसर्गिकरित्या प्राणवायु उद्यान (ऑक्सिजन पार्क) उभारणे, रुग्णालयातील औषध पुरवठा, मास्क, पीपीई किट, शस्त्रक्रिया उपकरणांचा पुरेसा साठा उपलब्ध करणे, सिटी स्कॅन, एमआरआय व इतर वैद्यकीय तपासणी उपकरणे आधुनिक करणे आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे वर्ग केलेल्या रंगभवन थिएटरच्या जागेचा सुयोग्य वापर करणे असे अनेक प्रश्न मांडले. याबाबत आपण सकारात्मक असून लवकरच हे सर्व प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पांडुरंग सकपाळ यांना दिले. तर वैद्यकीय शिक्षण विभागाला यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.


यासंदर्भात मंगळवारी (22 डिसेंबर) मंत्रालय मुंबई इथे राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीस शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत मानकेश्वर, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक अशोक खोब्रागडे, गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चिखलकर, कामा व आल्बेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पालवे, सर जे जे समूह रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि माजी नगरसेवक गणेश सानप, वैद्यकीय शिक्षण उपसचिव प्र ब सुरवसे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले आदि अधिकारी उपस्थित होते.