मुंबई : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना शबरीमलाच्या स्वामी अयप्पांच्या दर्शनाविनाच मुंबईत परतावं लागलं. दर्शनासाठी शबरीमला मंदिरात गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. यामुळे केरळ पोलिसांनी देसाईंना परतण्याची विनंती केली. त्यानंतर तृप्ती देसाई शुक्रवारी (16 नोव्हेंबर) रात्री मुंबईत दाखल झाल्या.


तृप्ती देसाई शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेल्या होत्या. पण कोची विमानतळावर आंदोलकांनी त्यांचा मार्ग रोखला. यानंतर देसाई दिवसभर विमातळावरच थांबल्या. केरळ पोलिसांच्या विनंतीनंतर त्या मुंबईत परतल्या. मात्र मुंबई विमानतळावरही भाविक आणि आंदोलक त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे.

"कोची विमानतळाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. त्यामुळे मला विमानतळावरच रोखण्यात आलं. मी शबरीमला मंदिरात जाणार होते, पण परिस्थिती एवढी बिघडली होती की, टॅक्सी किंवा बस मला तिथे घेऊन जाण्यास नकार देत होते. यावेळी मला बऱ्याच धमक्या मिळाल्या. विरोध पाहिल्यानंतर मला सुरक्षा देण्यात आली. पण विरोध आणखी तीव्र झाल्याने परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांनी मला परत जाण्यास सांगितलं. त्यामुळे मी मुंबईत परतले," असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं.

"मात्र मुंबईतील विरोध पाहून मला धक्का बसला. मला वाटतंय की हा पब्लिसिटी स्टंट होता. मी केरळच्या मुख्यमंत्र्यांना सुरक्षेसंदर्भात पत्र लिहिलं होतं. परंतु त्यांनी उत्तर दिलं नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महिलांना शबरीमला मंदिरात जाण्याचा अधिकार मिळायला हवा. केरळच्या मंदिर प्रशासनानेही महिलांच्या अधिकारांसाठी सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळला पाहिजे," असंही तृप्ती देसाई यांनी सांगितलं.

"याला राजकीय रंग दिला जात आहे. आम्ही याआधी अशाप्रकारच्या मंदिर प्रवेशासाठी जी आंदोलनं केली, त्यावेळी भाजपची साथ होती. पण आता भाजप आम्हाला अधिकार देण्यात अपयशी ठरल्याचं दिसत आहे," असा आरोपही देसाई यांनी केला. "मात्र मी पुन्हा शबरीमला मंदिरात जाणार आणि महिलांच्या समान न्याय, अधिकारांसाठी लढत राहणार," असंही त्यांनी सांगितलं.