भिवंडी : मोबाईल आणि पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने कंटेनर (ट्रक) चालकाचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे. विशेष म्हणजे खून करून फरार झालेल्या गुन्हेगाराने कुठलाही पुरावा घटनस्थळी सोडला नव्हता. मात्र लुटमारी करताना या गुन्हेगाराने "हम गांववाले है' असं बोलून वाद घेतला. या एकाच शब्दामुळे पोलिसांनी त्याला शोधून काढलं. तसंच त्याच्यासह 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतलं आहे. किरण नथ्थु पाटील (वय 27 वर्षे) असं या गुन्हेगाराचं नाव आहे. तर आझम शाबल अन्सारी (वय 28 वर्ष) असं खून झालेल्या ट्रक चालकाचं नाव असून तो मुंबईचा रहिवासी होता.  


भिवंडीतील राजलक्ष्मी कंपाऊंड काल्हेर इथे नवी मुंबईतून आझम शाबल अन्सारी कंटेनर घेऊन माल घेण्यासाठी येऊन उभा राहिला. मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनरमध्ये झोपला असता त्या ठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या दोन आरोपी कंटेनरच्या केबिनमध्ये लुटीमरीच्याच्या उद्देशाने घुसले. त्यांनी आझम शाबल अन्सारीसोबत वाद घातला. "आम्ही गाववाले आहोत, आम्ही कुठेही फिरणार, तू कोण विचारणारा?" असा दम देखील आरोपींनी कंटेनर चालकाला दिला होता. दम दिल्यानंतर दोन्ही आरोपी निघून गेले, मात्र काही वेळाने पुन्हा तिथे येऊन रागाच्या भरात त्यांनी चालकाच्या डोक्यात दगड मारुन हत्या केली होती.


या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याचा समांतर तपास करणाऱ्या भिवंडी गुन्हे शाखा करत करत होती. गुन्ह्याबाबत कोणताही पुरावा नसताना तक्रारदार सत्यप्रकाश सदाशिव मिश्रा यांनी सांगितलं की, "आरोपी बोलले की आम्ही गाववाले आहोत." या संभाषणावर लक्ष केंद्रीत करत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली  धागा पकडून गुन्हे पार्श्वभूमी असलेल्यांची माहिती घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नथ्थू पाटील याला मिठपाडा इथे सापळा रचून ताब्यात घेतलं. त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. त्यांच्याकडे आढळलेल्या तीन मोबाईलची चौकशी केली. हा फोन 10 जून रोजी एक गोदामात झोपलेल्या कामगाराचा असल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर हत्येसह मोबाईल चोरी असे दोन्ही गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. 


आरोपी किरण पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी चोरी घरफोडी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. कोणताही पुरावा नसताना गुन्हे शाखेने संभाषणाचा धागा पकडून हत्येच्या गुन्ह्याची उकल केल्याने गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.