मुंबई : मुंबईतल्या वडाळा भागात भरधाव ट्रकच्या धडकेत 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 तरुण गंभीर जखमी झाला आहे. विनायक ढगे, सिद्धेश मासे अशी मृत तरुणांची नावं आहेत, तर सिद्धेश चव्हाण अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मराठा मोर्चात सामील होऊन घरी परतत होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली.


अपघात कसा झाला?

मुंबईतील वडाला भागातील भक्ती पार्क सर्कलजवळ ट्रकने तीन बाईकना धडक दिली. बुधवारी (9 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारस ही घटना घडली.

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. सायन हॉस्पिटलमध्ये जखमीला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

विनायक ढगे, विल्सम जोसेफ, सिद्धेश मासे आणि सिद्धेश चव्हाण हे चौघे बाईकवरुन जात घरी जात होते. मराठा मोर्चात सहभागी झाल्यानंतर चेंबूर येथील आपल्या घरी हे चौघेही परतत होते.

भक्ती पार्कच्या दुसऱ्या बाजूने विनायक आण विल्सन जोसेफ आयमॅक्स थिएटरच्या दिशेने जात होते. भक्ती पार्क मोनो रेल स्टेशनजवळ ते थांबले होते. विनायक रस्ता क्रॉस करुन सिद्धेश मासे आणि सिद्धेश चव्हाण यांच्याशी बोलण्यासाठी जात होता, तेवढ्यात वेगाने येणाऱ्या ट्रकने विनायक, सिद्धेश मासे आणि सिद्धेश चव्हाण यांना जोरदार धडक दिली आणि ट्रक डिव्हायडरवर चढला.

यामध्ये विनायक ढगे याचा जागीच मृत्यू झाला, तर सिद्धेस मासे आणि सिद्धेश चव्हाण गंभीर जखमी झाले होतेे. त्यांना जवळील सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी सिद्धेश मासेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सिद्धेश चव्हाणची प्रकृती चिंताजनक आहे.

आरोपी ड्रायव्हर अटकेत

पोलिसांनी आरोपी ट्रक ड्रायव्हरला अटक केली असून, त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ड्रायव्हर मोहम्मद कलीम शेख याची वैद्यकीय तपासणी केली असून, अपघातावेळी ड्रायव्हर दारु प्यायला होता का, याची चौकशीही पोलिस करत आहेत.