मुंबई : टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी (TRP Scam Case) रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याआधीही टीआरपी घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी विकास खानचंदानी यांची चौकशी केली होती. दरम्यान, आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.


टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांची सुरुवातीला चौकशी करण्यात आली होती. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. त्यावेळी मात्र विकास खानचंदानी चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते क्राईम ब्रांचसमोर चौकशीसाठी हजर राहिले होते.


गेल्या तीन महिन्यांपासून टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांची चौकशी झाली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच टीआरपी घोटाळ्या प्रकरणी पुढील तपास क्राईम ब्रांचकडून सुरु आहे.


मुंबई पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त


माध्यम क्षेत्रात खळबळ माजवणारी एक बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली होती. या प्रकरणी 2 मराठी चॅनेलच्या मालकांना देखील अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. रिपब्लिक टीव्हीची देखील याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.


माध्यमांमध्ये टीआरपीला (TRP) अनन्यसाधारण महत्व आहे. काही माध्यमांनी एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं होतं. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार असल्याचे मुंबई पोलीस परमबीर सिंह यांनी त्यावेळी सांगितलं होतं. टीआरपी रेटींगचं सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीचा डेटा लिक झाल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.