मुंबई : तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय मंगळवारी आपला निर्णय देणार आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. कायद्यानं गुन्हा ठरवल्या नंतर या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मागण्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग असावा.

वसईतील रहिवासी असलेल्या इन्तेखाब आलम मुन्शी यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. कायद्यानं बंदी घातलेल्या तिहेरी तलाकचा वापर करत मुन्शीनं आपल्याला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत त्याच्या पत्नीनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी एफआयआर नोंदवला. त्यामुळे आता अटकपूर्व जामिनासाठी मुन्शीनं हायकोर्टात धाव घेतली आहे.

तक्रापदाराच्या मते मुन्शीनं 22 सप्टेंबरला तिहेरी तलाक दिल्याचं सांगितलं होते. तर मुन्शीचे वकील विन्सेन्ट डिसिल्वा यांनी मुन्शीकडून जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यात घटस्फोटासाठी दोन नोटीसा पाठवल्या असल्याचा युक्तिवाद कोर्टापुढे केला. तर 22 सप्टेंबरला त्यानं तिसरी नोटीस पाठवली असं स्पष्ट केलं. पण सदर महिलेचे वकील अमिन सोलकर यांनी आपल्याला आधीच्या दोन नोटीस मिळाल्याच नसल्याचा दावा केला.

या वर्षी मे महिन्यात मुन्शीनं त्याच्या पत्नीला माहेरी पाठवलं आणि जुलैमध्ये घटस्फोटाचा अर्ज सादर केला आहे. हा खटला सुरु असतानाच 22 सप्टेंबरला तिहेरी तलाक झाला असल्याची नोटीस सदर महिलेला मिळाली. त्यानंतर या महिलेनं 23 ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार दिली. वसईतील सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात मुन्शीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यानं आता हायकोर्टात धाव घेतली आहे.