मुंबई : गोरेगावच्या आरे कॉलनीतील इन्फीनिटी आयटी पार्कजवळ जंगलात भीषण आग लागली आहे. सुके गवत असल्याने मोठा प्रमाणात ही आग जंगलात पसरत आहे. अग्निशमन दलाचे जवळपास 100 जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


सोमवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असले तरी आग विझवण्यात मोठे अडथळे त्यांना येत आहेत. ज्याठिकाणी ही आग लागली आहे, तेथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यासाठी रस्ताही उपलब्ध नसल्याचं समोर येत आहे.


आग लागलेलं ठिकाण वनखातं, फिल्मसिटीच्या अखत्यारित आहे. सुकलेलं गवत असल्याने आग झपाट्यानं पसरत असल्याचं आदिवासी पाड्यांना धोका निर्माण झाला आहे. आगीची तीव्रता लक्षात घेता स्थानिकांना आणि पाळीव जनावरांना त्याठिकाणाहून सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरू केलं आहे.


या आगीत जंगलातील झाडांचं नुकसान तर होणारच आहे, तसेच वन्य प्राण्यांची मोठी हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीची भीषण दृश्य दूरपर्यंत दिसत आहेत.


जंगलात ही आग का आणि कुणी लावली? याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आगीबाबत संशयही व्यक्त केला जात आहे. याठिकाणी मेट्रोचं आणि इतर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे ही आग लागली आहे की लावली आहे, असा संशय आरे बचाव चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच या आगीच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.