मुंबई : सध्या अनेक देशात विविध लस निर्मितीच्या क्षेत्रात असणाऱ्या कंपन्या आपल्या कोरोनाविरोधातील लशीच्या मानवी चाचण्या करून घेत आहेत. त्यामध्ये भारतातही काही कंपन्यांच्या चाचण्या चालू आहेत. यामध्ये आतापर्यंत राज्यातील विविध रुग्णालयात या चाचण्या करण्याचे काम सुरु आहेत. त्यातच आता भारतात विकसित करण्यात येणारी स्वदेशी लशीच्या चाचण्या राज्य शासनाच्या सर जे जे समूह रुग्णालयात करण्यात येणार आहे. याप्रकरणी सर्व कागद पत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून या मानवी चाचण्या करीता आवश्यक असणाऱ्या स्वयंसेवकांची नोंदणी पुढील आठवड्यात सुरु करण्यात येणार आहे. यापूर्वी या स्वदेशी बनावटीच्या चाचण्या महाराष्ट्रातील नागपूर येथील एका संस्थेत करण्यात आल्या होत्या.


मुंबईमध्ये आतापर्यंत महापालिकेच्या के इ एम आणि नायर रुग्णालयात अशाच प्रकारच्या एका वेगळ्या कंपनीच्या लशीच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्याचे काम आद्यपही सुरु आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएम आर) भारत बायोटेक कंपनी सोबत करार केला असून त्यांच्या या 'कोव्हॅक्स' या लसीच्या मानवी चाचण्याला परवानगी दिली आहे. या हैदराबाद स्थित कंपनीने ही लस पुणे येथील राष्टीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही) संस्थेबरोबर संयुक्तपणे विकसित केली आहे. या लसीची मानवी चाचण्या करण्याकरिता यापूर्वीच देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली होती.


याप्रकरणी सर जे जे समूह रुग्णालयाचे, प्रभारी अधिष्ठाता, डॉ. रणजित माणकेश्वर यांनी, यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले कि, "मानवी चाचण्यांच्या या तिसऱ्या टप्प्यात 1000 स्वयंसेवकांची गरज असून त्याच्या नोंदणीचे काम पुढच्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. याकरिता रुग्णालयातर्फे पुढील आठवड्यात एक टेलिफोन क्रमांक देण्यात येणार आहे. त्यांच्याद्वारे ज्या स्वयंसेवकांना या चाचण्यामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांना नावनोंदणी करण्यात येणार आहे. ती नोंदणी झाल्यानंतर त्यांची पात्रता तपासून योग्य त्या 1000 स्वयंसेवकांना या चाचण्यांमध्ये सहभागी करून घेणार आहोत. यासाठी आमची डॉक्टरांची टीम आमसभेत मानवी चाचण्यांची ट्रायल करणार आहेत. या चाचणी करीता स्वयंसेवकाचे वय 18 पेक्षा अधिक असणे अपेक्षित आहे. शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचा कोरोनाचा संसर्ग झालेला नसावा आणि त्याच्या कुटुंबियातही कोणत्याही सदस्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नसावा. खूप लोकांनी फोन करून आणि ई-मेल करून या ट्रायल मध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे 1000 स्वयंसेवक लवकर मिळतील आणि पुढचे काम सुरु होईल."


वास्तवात ही लस शरीरावर टोचण्याकरिता आणखी काही काळ जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसीत केलेल्या लसीच्या मानवी चाचण्या जगभरात करण्यात आल्या आहेत. त्यांणी विज्ञान जगतासमोर आपले निकालही जाहीर केले आहेत. त्या लसीचे उत्पादन भारतात पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येणार आहे. सध्या या लशीचा जगभरात डंका आहे. मात्र, सर्वांचे लक्ष स्वदेशी लसीच्या निकालावर असणार आहे.


त्याशिवाय जगभरात अनेक खासगी औषधनिर्मितीतील कंपन्या सध्या कोरोनाविरोधातील लस विकसित करण्याचे काम करत आहे. जगभरातील संशोधक 150 पेक्षा अधिक लसींवर काम करत आहे. एखादी लस विकसित करण्याकरिता फार मोठा काळ कंपन्या घेत असतात. त्यापैकी काही कंपन्यांची माहिती लोकांसमोर मांडण्यात आली आहे. या आजारावर जगभरात प्रथम अमेरिकेतली मॉडर्ना कंपनी, फायझर कंपनी, भारतातील झायडस, ऑस्ट्रेलियातील व्हॅक्सिन, क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी, चीनमधील सिनोफार्मा, सिनोवाक बायोटेक, रशिया येथील सेचोनोव्ह, आपल्या आणि अन्य देशातील काही कंपनीने लस बनवून मानवी चाचण्या करण्यास सुरुवात केली असून त्यासुद्धा आता तिसऱ्या ते अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.


संबधित बातमी : 


International Flight : आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार 


Lockdown | लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्राची परवानगी आवश्यक; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचना