मुंबई : स्वातंत्र्यानंतर देश अनेक दहशतवादी हल्ल्यांचा साक्षीदार बनला आहे. याच हल्ल्यांमध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचाही समावेश आहे, जो 26 नोव्हेंबर 2008 रोजी झाला होता. या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. हल्ल्याला एक तप झालं असलं तरी 26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयाच्या मनात कायम आहेत.


26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाले. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नारिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. 2008 मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईची शान म्हणून ओळख असेलल्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता, ज्यात 160 हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते.


मुंबईत दहशत


पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी हॉटेल ताज, नरिमन हाऊस, होटल ओबेरॉय आपल्या ताब्यात घेतलं होतं. याशिवाय अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्येही हल्ला केला. त्यांच्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे झाले. तर हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचा जीव घेतला. अतिरेक्यांनी एक टॅक्सी बॉम्बने उडवली होती. पोलिसांना मदत म्हणून रॅपिड अॅक्शन फोर्स (आरपीएफ), मरिन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडो यांना पाचारण करण्यात आलं. परंतु अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना तीन दिवस लागले. जवळपास 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती.


अनेक पोलीस शहीद, एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात यश


या हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं. हा दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं. परंतु तुकाराम ओंबळे शहीद झाले. त्यांच्यामुळेच अजमल कसाबला जिवंत पकडता आलं आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यास मदत झाली.


कसाबला फाशी


मुंबईवरील हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला तातडीने फासावर लटकवण्याची मागणी केली जात होती. त्याने गुन्ह्याची कबुली देत हल्ल्यातील भूमिका स्वीकारली होती. कसाबला मुंबईतील आर्थर रोड जेलमधील अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं. खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली. कसाबला मे 2010 मध्ये विशेष कोर्टाने दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. तिथेही फाशीची शिक्षा कायम राहिल्यानंतर कसाबने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला. राष्ट्रपतींनीही त्याचा अर्ज फेटाळला. परंतु कसाबला फाशी देण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये रोष होता. 2012 मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारला कसाबच्या फाशीाबाबतची फाईल मिळाली आणि राज्य सरकारने 21 नोव्हेंबरला फाशी देण्याचं निश्चित केलं. अखेर 21 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं.


इस्रायलच्या ऐलातमध्ये 26/11 हल्ल्याच्या स्मरणार्थ स्मारक


इस्रायलच्या ऐलात शहरामध्ये 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मरणार्थ विशेष स्मारक उभारले जाणार आहे. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यामध्ये ज्यू समाजाच्या चाबडा हाऊसलाही लक्ष्य करण्यात आलं होतं. यामध्ये ज्यू समाजातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. 26/11 मुंबई हल्ल्यातील सर्व मृतांच्या स्मरणार्थ ऐलात शहरात एका चौकामध्ये विशेष स्मारक उभारलं जाणार आहे.