मुंबई : मुंबईत झाडांची लागवड आणि झाडांचं संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघ वरळीतच झाडं तोडली गेल्याचा आरोप मनसेनं केलं आहे. जाहिरातीच्या होर्डिंगला अडथळा निर्माण होतो म्हणून अवैधरित्या झाडं कापल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.


वरळी सी फेस नजिकच्या मुंबई महापालिकेच्या शाळेजवळ, तसेच कावेरी सहकारी सोसायटीच्या आवारातील झाडं कापण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे. तसेच परिसरातील इतर झाडंही इंजेक्शन देऊन मारले जात असल्याचा दावाही मनसेनं केला आहे. याबाबत मनसेनं मुंबई महापालिका आयुक्त आणि उद्यान अधीक्षकांना तक्रारीचं पत्र देखील दिलं आहे.


विशेष म्हणजे ज्या होर्डिंगसाठी ही झाडे कापली गेली, त्या होर्डिंगवर मुंबई महापालिकेच्याच स्वच्छ भारत सर्वेक्षणाची जाहिरात आहे. ही झाडे कापण्यामागे शिवसेनेशी जवळीक असलेल्या होर्डींग मालकाचे आर्थिक हित बिघडू नये, असा उद्देश असल्याचंही सूत्रांकडून समजतंय. त्यामुळे आपल्या मतदारसंघातच झाडं तोडण्याच प्रकार उघडकीस होत असेल तर पर्यावरण मंत्री काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.


शिवसेनेकडून बीएमसी आयुक्तांच्या अधिकारावर कुऱ्हाड, परवानगीशिवाय एकही झाड तोडता येणार नाही



दोन वर्षांपूर्वी भाजपा सरकारने महापालिका आयुक्तांना ‘वन संवर्धन कायदा-75’ अंतर्गत 25 झाडे तोडण्याचा परवानगी देण्याचा अधिकार दिला होता. या निर्णयाचा गैरफायदा घेत अनेक विकासक आणि आस्थापनांनी झाडे तोडण्यासाठी 25-25 झाडांचे प्रस्ताव आणून मंजुरी मिळवली. यामध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल पंधरा हजारांवर झाडे तोडण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. यामुळे मुंबईत पर्यावरण संवर्धन आणि झाडे वाचवण्यासाठी यशवंत जाधव यांनी महापालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून महापालिका आयुक्तांचा 25 झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा देत ठरावाची सूचना बहुमताने मंजूर केली होती.


या ठरावाच्या सूचनेचे महापालिका आयुक्तांनीही स्वागत केले आहे. त्यांनी याची अंमलबजावणी करण्यासाठी आजच्या बैठकीपासून एका झाड तोडायचे असले तरी त्याचे प्रस्ताव वृक्षप्राधिकरण बैठकीत मंजुरीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. आजच्या बैठकीत 205 झाडे तोडण्याचे नऊ प्रस्ताव मांडण्यात आले होते. यामध्ये खासगी आणि काही आस्थापनांच्या कामासाठी ही झाडे तोडण्यात मंजुरी मागण्यात आली होती. मात्र रेल्वेच्या उपक्रमासाठी केवळ एक झाड तोडण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे 205 झाडांची कत्तल टाळली आहे असे जाधव यांनी सांगितले.