मुंबई : हायकोर्टाचा आदेश येताच आरे कारशेडमध्ये रात्रीतून वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तरी, आरेतील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला. तरी, पोलिसांनी आंदोलक पर्यावरणप्रेमींची धरपकड करण्यात आली आहे. तरी, अजूनही आरे परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान आरे कॉलनीत जमावबंदी करण्यात आली आहे. या परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.

आरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर प्रशासनाकडून आरे परिसरातील झाडे तोडण्यात आली. स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत याठिकाणच्या तब्बल 400 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास आरे कारशेडच्या ठिकाणी झाडांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर काहीच वेळात पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांनी प्रशासनाचे काम बंद पाडले.

याठिकाणी पर्यावरण प्रेमींचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता पोलीस प्रशासनाने अधिकची कुमक मागवली आणि पर्यावरणप्रेमींची धरपकड केली. पोलिसांनी यावेळी काही जणांना ताब्यात घेतले आणि मारहाण देखील केली. दरम्यान पर्यावरण प्रेमी आणि आंदोलकांनी रात्रभर याठिकाणी आंदोलन सुरूच ठेवलं. यावेळी चिघळणारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पथक देखील मागवले होते.

पोलिसांनी मध्यरात्री अडीचच्या दरम्यान सर्व आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं आहे. सध्या हे आंदोलक समतानगर आणि  आरे पोलीस ठाण्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे. एकूण 60 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एमएमआरडीएमार्फत मेट्रो 3 साठी आरेमध्ये कारशेड बांधण्यात येणार आहे आणि त्यासाठी आरेतील 2 हजार 646 झाडं तोडली जाणार आहेत.

दरम्यान आरेतील जंगलतोडीनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या वृक्षतोडीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी विरोध केला आहे. आणि विकासासाठी जैवविविधतेला संपवणं लज्जास्पद असल्याचं म्हणत वृक्षतोडीविरोधात आंदोलकांना पाठिंबा दर्शवला आहे.


सगळं अट्टाहास आरेमध्ये का? ही झाडे कापून मुंबईच्या प्रदूषणात वाढ होणार आहे. पुढच्या पिढीचे भविष्य प्रदूषणाच्या विळख्यात आहे. आरेला विरोध करणारे आणि आरेतील जंगल तोडणारे काल एकत्र झाले, अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.


तर अंधारात काळे कारनामे करणारे गुन्हेगार असतात आणि या सरकारी गुन्हेगारांना जनतेच्या न्यायालयात शासन होणं आवश्यक आहे. जाहीर निषेध!, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

मध्यरात्री झाडे तोडण्याचा सरकारचा निर्णय युती सरकारच्या क्रूर वृत्तीचे दर्शन घडवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीही सर्वोच्य न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती घेऊ नये, म्हणून मध्यरात्रीच झाडे कापण्यात आली. राष्ट्रवादीच्याया वतीने मी याचा तीव्र निषेध करतो, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

या वृक्षतोडीविरोधात सोशल मीडियावर देखील मोठा संताप व्यक्त केला जात आहे. #AareyForest,#SaveAarey,#AareyColony,#SmackDown असे हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहेत. या माध्यमातून सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या