मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, नाशिक आणि पुणेकरांसाठी आज विधानसभेत महत्वाच्या घोषणा केल्या. पुढच्या वर्षभरात अनेक महत्त्वाचे मेट्रो प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केलं. तसेच मुंबई आणि पुण्यातील अंतर अर्ध्या तासावर आणण्यासाठी हायपरलूप प्रकल्प लवकरच प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.


कोस्टल रोडसाठी मच्छिमार बांधवांची जागा जाणार नाही
मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पामुळे कुठलाही कोळीवाडा बाधित होणार नाही. मच्छिमारांची जागा कोस्टल रोडसाठी सरकार घेणार नाही. कोस्टल रोडमुळे एकही मच्छिमार प्रकल्पबाधित होणार नाही. मात्र तरीही कुणी बाधित झालंच तर ट्रान्सहार्बर लिंक करताना बनवलेल्या फॉर्म्युल्यानुसार भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांची जाहीर केलं.


भूमिगत मेट्रोचं 50 टक्के काम पूर्ण
मेट्रो प्रकल्पाचं काम वेगाने सुरु आहे. मेट्रोच्या भूमिगत मार्गाचं 50 टक्के काम पूर्ण झालं आहे. याचा 2021 ला पहिला टप्पा आणि 2022 ला दुसरा टप्पा पूर्ण करु, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. दहिसरला जाणाऱ्या मार्गाचं 65 टक्के काम पूर्ण झालं आहे. वांद्रे-मंडाले, ठाणे-भिवंडी -कल्याण, कासारवडवली - गायमुख हे मार्ग 2022 पर्यंत पूर्ण करु, दहिसर ते अंधेरी पूर्व 68 टक्के काम पूर्ण झालं असून हा प्रकल्प 2020 साली पूर्ण होईल. दहिसर-मीरा भाईंदर मार्गाचं लवकरच टेंडर देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नवी मुंबईतील मेट्रो 2020 च्या सुरुवातीला काम पूर्ण होईल. पहिला मेट्रोला मंजुरीसाठी 5 वर्षे लागली तर इतर मेट्रोसाठी एक वर्षाच्या आत परवानग्या मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनची क्षमता 50 टक्क्यांनी वाढवणार असून यासाठी एलवेटेड मार्ग तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांची जाहीर केलं. यासाठी केंद्र सरकारकडून मदत घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



नाशिकचा डीपीआर तयार
नाशिकला हायब्रीड मेट्रोचा प्रयोग करत आहोत. हायब्रीड मेट्रो इतर मेट्रोसारखीच असते पण रुळांऐवजी चाकांवर चालते. यावर इलेक्ट्रीक बसही चालते. छोट्या बॅटरीची बस फीडर म्हणून वापरून या मार्गावर चालू शकते आणि पुन्हा उतरून 20 किमी चालवून लोकांना या हायब्रीड मेट्रोला जोडू शकते. नाशिकचा डीपीआर तयार झाला आहे. तो लवकरच कॅबिनेट मध्ये मंजुरीसाठी येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असेल
एसआरए पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. विकासक रहिवाशांना काही काळानंतर भाडे देत नाहीत. यासाठी 3 महिन्यांचं ऍडव्हान्स भाडं घ्यायचा निर्णय सरकारने आज घेतला आहे. तसेच बीडीडी चाळीतील ना. म. जोशी मार्ग येथील स्थलांतरण सुरू झालं असून वरळीतील 14 चाळीचे सर्व्हेक्षण झाले आणि लवकरच तेथील तर स्थलांतरण सुरू होईल. येथील रहिवाशांना 500 चौ. फुटापेक्षा मोठं घर मोफत मिळणार आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.



इतर महत्त्वाच्या घोषणा




  • डॉ. आंबेडकरांचे स्मारक 2020 च्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करू

  • मेट्रो, मोनो, लोकल ट्रेन, बसेस अशा सर्व दळवळणाच्या साधनांना सिंगल तिकिटावर आणण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून एमएमआरडीएची नेमणूक करणार

  • वसई-भाईंदर खाडी पुलाचे बांधकाम सुरू होणार आहे

  • ट्रान्स हार्बर लिंक 22 किमीचा समुद्री मार्ग वेगाने सुर आहे

  • विरार ते अलिबाग मल्टी-मॉडेल 123 किमी लांबीचा कॉरिडॉर तयार करतोय. नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी बंदर या कॉरिडॉरला जोडणार

  • नयना सिटीचा पहिला विकास आराखडा तयार झाला, तर दुसऱ्याला मान्यता देतोय

  • मेट्रो, मोनो, लोकल ट्रेन, बसेस अशा सर्व दळवळणाच्या साधनांना सिंगल तिकिटावर आणण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून एमएमआरडीएची नेमणूक करणार