मुंबई: एटीएममधील खडखडाट बंद होतो की नाही, तोपर्यंतच आणखी एक झटका बसणार आहे. 5 पेक्षा जास्तवेळा एटीएममधून पैसे काढल्यास, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 20 रुपये चार्ज द्यावा लागेल.  सध्या हा चार्ज 15 रुपये आहे.


चार्ज का वाढणार?

रिझर्व्ह बँकेने एटीएम ट्रान्झॅक्शनसाठीचे नियम आणखी कडक केले आहेत. त्यामुळे एटीएम ऑपरेटर्सनी ट्रान्झॅक्शन चार्ज वाढवण्याची मागणी केली आहे. खर्च वसूल व्हावा, यासाठी एटीएम ट्रान्झॅक्शनमध्ये 3-5 रुपयांची वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली.

जुलैपर्यंत नवे नियम लागू होणार

नवे नियम जुलैपर्यंत लागू करा, असं आरबीआयने बँकांना बजावलं आहे.

कॅशव्हॅनसाठी आरबीआयने केलेल्या नियमानुसार, कॅश मॅनेजमेंट कंपन्यांकडे कमीत कमी 300 कॅश व्हॅन, प्रत्येक कॅश व्हॅनमध्ये एक ड्रायव्हर, दोन बंदुकधारी आणि दोन कर्मचारी असावेत.

याशिवाय प्रत्येक गाडीत जीपीएस, भू मॅपिंग, जवळच्या पोलीस स्टेशनचा पत्ता असायला हवं. इतकंच नाही तर एटीएमबाबत ज्याने प्रशिक्षण घेतलं आहे, तीच व्यक्ती एटीएममध्ये पैसे भरणे, एटीएम हाताळण्याचं काम करेल.

हा सर्व खर्च बँकांना न परवडणारा आहे. त्यामुळे एटीएम ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

19 कंपन्यांकडे कॅश मॅनेजमेंट

सध्या देशात 19 कंपन्यांकडे एटीएम कॅश मॅनेजमेंटचं काम आहे. या कंपन्यांना हा सर्व भार सोसावा लागतो. त्या कंपन्या बँकांकडून तो वसुल करतात. परिणामी बँका तो चार्ज ग्राहकांवर लाददात.