Congress 2nd List | काँग्रेसची दुसरी यादी, 52 उमेदवारांची उमेदवारी जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2019 08:43 AM (IST)
कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांना, तर चिखलीमधून भाजप प्रवेशाची चर्चा असणाऱ्या राहुल बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर दक्षिणमधून विद्यमान आमदार भिसेंचा पत्ता कट करून काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई : विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी काल रात्री जाहीर करण्यात आली. या यादीत 52 उमेदवारांची नावं आहेत. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाणांना, तर चिखलीमधून भाजप प्रवेशाची चर्चा असणाऱ्या राहुल बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर दक्षिणमधून विद्यमान आमदार भिसेंचा पत्ता कट करून काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी 29 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्यासह 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीत 52 उमेदवारांचा समावेश आहे. तर तिसरी आणि अंतिम यादी उद्या रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी असा पक्षाचा आग्रह होता. मात्र चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत केल्याने त्यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदार संघातून हे दोघे बंधू धीरज देशमुख आता मैदानात असतील.