ठाणे : वाहतूक पोलिसांवरील हल्ल्याचं सत्र सुरुच आहे. ठाण्यात आज एका बाईकस्वाराने दादागिरी करत वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली.


दम्मानी इस्टेट इथल्या गोल्ड जिमसमोरील फूटपाथवरील पवन पजवानी या 23 वर्षीय तरुणाची बाईक टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी उचलली. त्यानंतर तरुणाने त्याची बाईक व्हॅनवरुन खाली खेचण्यास सुरुवात केली.  दंड भरण्यासाठी त्याने दोन हजारांची नोट दिली आणि आताच्या आता पावती देऊन गाडी सोडण्यास सांगितलं.

परंतु माझ्याकडे सुट्टे पैसे नाही, बाजूलाच ट्रॅफिक ऑफिस आहे, तिथे पैसे भरुन गाडी घेऊन जा, असं हवालदार मोरे यांनी तरुणाला सांगितलं. यानंतर संतापलेल्या पवन पजवानीने काशिनाथ मोरे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

हवालदार काशिनाथ मोरे यांच्या तक्रारीवरुन नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी तरुणाविरोधात 332, 353, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ